कऱ्हाड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त झालेल्या प्रशासकाविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन सभापती, उपसभापतींनी पुन्हा पद्भार स्वीकारला असला तरी १८ जानेवारीला त्यांचा कार्यकाल संपल्याने पुन्हा प्रशासकाची नेमणूक झाली आहे.याबाबतची माहिती अशी की, तालुक्याच्या राजकारणात गटतट बाजूला ठेवून महाआघाडी आकाराला आली़ आणि कऱ्हाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर झाले़ या संचालक मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत आपल्या कार्याचा ठसा उमटवला; पण राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर नव्या सहकारमंत्र्यांनी कऱ्हाडच्या बाजार समितीला पहिला दणका दिला़ त्यामुळे या बाजार समितीवर उपनिबंधक संपतराव गुंजाळ यांची ११ नोव्हेंबरपासून प्रशासक म्हणून नेमणूक झाली़ त्यानंतर पाच-सहा दिवसांनंतर पदमुक्त झालेल्या संचालक मंडळातील सभापती दाजी पवार व उपसभापती सुनील पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आमची मुदत शिल्लक असूनही चुकीच्या पद्धतीने प्रशासक नियुक्ती करण्यात आल्याबाबत याचिका दाखल केली़ त्याबाबत २२ डिसेंबरला उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रशासक रद्द करण्याचा निकाल दिला़ दरम्यान, दि. ५ जानेवारीला निकाल हाती पडताच सभापती दाजी पवार यांनी पदभार देण्याची वाट न पाहता स्वत:च जाऊन सभापतिपदाचा पद्भार घेतला. हा पद्भार घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या एका शेडचे भूमिपूजनही त्यांनी केले. दीड महिने प्रशासक कार्यरत असणाऱ्या प्रशासकाला संचालक मंडळाने थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले़ त्यावर उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने २२ डिसेंबरला प्रशासक रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे संचालक मंडळ मुदत संपेपर्यंत की निवडणूक होईपर्यंत राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होती. दरम्यान, उपनिबंधक संपतराव गुंजाळ यांनी बाजार समितीचे प्रशासक म्हणून पुन्हा पद्भार स्वीकारल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. (प्रतिनिधी)
कऱ्हाड बाजार समितीवर पुन्हा प्रशासक
By admin | Updated: January 20, 2015 00:04 IST