शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गतवर्षी आक्षेपार्ह छायाचित्र ग्रुपवर पडले. ते तातडीने डिलिट करा, असे मेसेज पालकांनी टाकले. त्यावर ‘ज्यांना बघायचं नाही त्यांनी डाऊनलोड करू नये, बाकीच्यांनी मजा घ्या’ असे उत्तर देण्यात आले. संबंधित पालकांनी जाहीर माफी मागितल्यानंतरच त्यांना पुन्हा एकदा ग्रुपमध्ये घेण्यात आले.
माध्यमिक विभागाचा ऑनलाइन वर्ग सुरू असताना एक पालक अंघोळ करून केवळ अंतरवस्त्र घालूनच कॅमेऱ्यापुढे वावरत होते. व्हिडिओ बंद करून विद्यार्थिनीने वडिलांना दूर जाण्याचंही सांगितलं; पण ते पुन्हा कॅमेऱ्यात दिसू लागल्यानंतर मात्र वर्गशिक्षकांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. छोटं घर असलेल्या पालकांनी मुलांना भिंतीला टेकून बसविलं, तर मागचा नजारा दिसणार नाही याचं साधं भानही नसतं.
शाळा ज्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेते, त्या ॲप्सचे प्रिमियम व्हर्जन घ्यावे. कारण त्यात तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. हे ॲप्स हाताळण्यासाठी, त्यातील बारकावे शिक्षकांना अवगत करून देण्यासाठी त्यांचीही कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. अनोळखी इसमांना सहभागी करून घेण्याचं टाळलं तर शिक्षक हे प्रकार सहज रोखू शकतात.
- मकरंद देशमुख, सायबरतज्ज्ञ
जे सारखं बघतो तेच वारंवार दिसतं!
मोबाइलवर यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक आदी ॲपवर तुम्ही जे सारखं बघता त्याचेच सजेशन्स येतात. सारखंसारखं बघण्यात आलेल्या विषयावरील व्हिडिओ ‘हे तुम्हाला आवडू शकेल’ म्हणून सुचविले जातात. त्यामुळे अनवधानाने नव्हे तर पालक मोबाइलमध्ये जे बघतात त्याच्याच लिंक डाउनलोडही होतात, हे पालकांनी ध्यानात ठेवावे. अभ्यासासाठी मुलांना देण्यात येणाऱ्या मोबाइल या कारणासाठीही स्वतंत्र असावा. याबरोबरच अनावश्यक ॲप्लिकेशनही मोबाइलमध्ये असू नयेत.
- संतोष शेडगे, मोबाइल व्यावसायिक