सातारा : सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. नगर विकास विभागाच्या वतीने जाहीर झालेले बदलीचे आदेश शुक्रवारी उशिरा प्राप्त झाले. ही बदली प्रशासकीय कारणास्तव झाल्याचे सांगण्यात येत असून, अभिजित बापट यांना सातारा पालिकेत दुसऱ्यांदा केवळ दहाच महिने काम करण्याची संधी मिळाली.
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी प्रशासकीय कामकाजाचा उत्तम समन्वय असणारे अभिजित बापट यांची सोलापूर महापालिकेतून साताऱ्यात दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. सोलापूर उपायुक्त पदाची जवाबदारी नाकारणाऱ्या अभिजीत बापट यांना साताऱ्यात आणण्यासाठी मोठी राजकीय मोर्चेबांधणी झाल्याने तत्कालीन मुख्याधिकारी रंजना गगे यांना पुणे महानगरपालिकेत बदलून जावे लागले. कोरोनाचा संक्रमणकाळ, प्रशासकीय कामांना गती देण्याचा प्रयत्न, नगरोत्थानच्या निधीसाठी विकासकामांचे नवीन प्रस्ताव सुरू असताना मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने वर्णी लागल्याचा लेखी आदेश नगर विकास विभागाला प्राप्त झाला आहे. संबंधिताना तत्काळ कार्यमुक्त करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर कोणाची वर्णी लागणार हा औत्सुक्याचा विषय आहे. अभिजित बापट यांनी २०१२ ते १६ या दरम्यान जिल्हा प्रकल्प संचालक व सातारा पालिका मुख्याधिकारी अशी सलग सेवा बजाविली साताऱ्याच्या विविध प्रश्नांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मात्र ते साताऱ्यात रुळण्यापूर्वीच त्यांची रवानगी पुण्याला झाली. सातारा पालिकेचे नवे मुख्याधिकारी कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.