पाटण : कोयना धरणात फक्त ८.६१ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने वीजनिर्मितीसाठी पाणी देणे बंद केले आहे. परिणामी १९६0 पैकी १८५0 मेगावॅट वीजनिर्मिती बंद झाली आहे. पावसाचे आगमन लांबणीवर पडले तर सुरू असणारी ११0 मेगावॅट वीजनिर्मिती कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाने दडी मारली आणि पाणीसाठा कमी होऊ लागला मोठा बिकट प्रसंग उभा राहणार आहे. १0५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातून १९६0 मेगावॅट वीजनिर्मिती होते. धरणात आजमितीस ८.६१ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. चौथ्या टप्प्यासाठी पाणी देणे बंद केल्यामुळे एक हजार मेगावॅट निर्मिती बंद झाली आहे. टप्पा क्रमांक एक आणि दोनमधून ६00 मेगावॅट वीजनिर्मिती होते. मात्र यापैकी टप्पा क्रमांक एक सुरु असून येथे फक्त ७0 मेगावॅट निर्मिती सुरू आहे. दुसरा टप्पा बंदच आहे. टप्पा क्रमांक तीन कोळकेवाडी येथून ३२0 मेगावॅट वीजनिर्मिती होते. मात्र, तोही बंद आहे. टप्पा क्रमांक चार तांबटवाडी येथून एक हजार मेगावॅट निर्मिती होते, मात्र तोही बंद आहे. पायथा वीजगृहातून ८0 मेगावॅट निर्मिती होते. येथे चार संच असून यापैकी दोन संच बंद असून येथून फक्त ४0 मेगावॅटच वीजनिर्मिती होत आहे. दरम्यान, पायथा वीजगृहातून नदीपात्रात येणारे पाणी सांगली जिल्ह्यातील गावांना जात आहे. (प्रतिनिधी)
कोयनेतून ९५ टक्के वीजनिर्मिती बंद
By admin | Updated: July 2, 2014 00:26 IST