सातारा : ‘येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयास व्हेंटिलेटर मशीन खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल; तसेच रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे आणि इतर अडचणी सोडविण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, नितीन बानुगडे-पाटील आदी उपस्थित होते.पोलिओच्या उच्चाटनासाठी प्रभावी काम झाल्याचे सांगून पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘सातारा शहरासाठी मंजूर झालेले पाचशे खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यात येऊन त्याचे कामही तातडीने सुरू कण्यासाठीप्रयत्न केले जातील. दोन-तीन दिवसांत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. ग्रामीण रुग्णालयांच्या आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात सिजरिंगची सुविधा असायला हवी. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही. जिल्हा रुग्णालयाचा व ग्रामीण रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल; तसेच जिहे-कठापूर योजना मार्गी लावून दुष्काळी भागाला न्याय देण्याचेही काम केले जाईल,’ असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयास व्हेंटिलेटरसाठी ८० लाख
By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST