सातारा : जिल्ह्यात जुलै महिन्यात धुवाँधार पाऊस झाल्यानंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, गेल्या दीड महिन्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तसेच सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख सहा धरणे भरण्यासाठी अजूनही १६ टीएमसीवर पाण्याची आवश्यकता आहे. सध्या या धरणांत १३२ टीएमसी पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हर फ्लो होतात. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणातून पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झालेला. दोन वर्षांपूर्वी तर कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहात होत्या. त्यामुळे आजुबाजुच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीही धरणे वेळेत भरली होती. यावर्षी मात्र, धरणे भरण्यास उशिर झालेला आहे. आताही पावसाळा सुरू होऊन तीन महिने होऊन गेले आहेत. पावसाळा संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.
जुलै महिन्यात पश्चिम भागात तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत होता. यामुळे शेती, पिके, रस्ते, घरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अतिवृष्टीमुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयनासारख्या धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आलेले. तसेच इतर धरणांतही पाणीसाठा वाढलेला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागला. सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे धरणांत मागील वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणात १४४.८३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो १३२ टीएमसी इतका आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठा मोठ्या प्रमाणात टिकून असला तरी ती भरणे महत्त्वाचे आहे. १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात ९३ टीएमसीवर पाणीसाठा आहे. हे धरण भरण्यासाठी अजून ११ टीएमसीच्या वर पाणी आवक आवश्यक आहे. सध्या पावसाची उघडीप कमी आहे, तर धरणात आवक अत्यल्प आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाचीच आवश्यकता आहे. इतर धरणे भरण्यासाठी चांगला पाऊस आवश्यक आहे.
चौकट :
पूर्व भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा...
जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात साठा आहे. ही धरणे भरली नसली तरी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. याला कारण म्हणजे पावसाने लावलेली चांगली हजेरी. पण, पूर्व माण, खटाव या तालुक्यातील तलाव, ओढे, बंधारे, कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरीही आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यातच आता खरीप हंगामातील पिकेही चांगली आली आहेत. या पिकांसाठी पाऊस आवश्यक आहे.