लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : घरात कोंडून राहिलेल्या मुलांना शाळेत पाठविण्याच्या तयारीचा भाग म्हणून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील ९३ टक्के शिक्षक लसवंत झाले आहेत. मात्र, वैद्यकीय कारणांनी ज्यांना लस घेणे शक्य झाले नाही त्या ७ टक्क्यांना लसीकरण झाल्याशिवाय शाळेत न येण्याचा सल्ला देण्याची मानसिकता करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन दिली होती. ही डेडलाइन उलटून गेली तरीही अद्याप ७ टक्के शिक्षकांनी लस घेतली नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालक चिंतेत आहेत.
शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. मात्र, अद्यापही शेकडो शिक्षकांनी कोरोना लसीकरण करून घेतले नाही. पहिल्या टप्प्यात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि पुढे लसींचा तुटवडा या दोन कारणांनी हे लसीकरण झाले नाही, तर काही शिक्षकांना आरोग्याच्या कारणांनी लस घेता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट :
एकूण कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी : २०५५६
लस घेतलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी : १९१६५
लस न घेतलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी : १३९१
लस न घेतलेल्यांची टक्केवारी : ९३.२६ टक्के
कोणत्या तालुक्यात किती?
वाई : ९२.३८
खटाव : ९५.४१
सातारा : ९२.४७
कऱ्हाड : ९०.४२
पाटण : ९०.८३
खंडाळा : ९३.२४
कोरेगाव : ९५.४९
माण : ९७.३९
महाबळेश्वर : ९४.९९
जावली : ९६.१५
फलटण : ९३.६७
लस न घेतलेल्यांचे काय?
शासनाने आदेश दिल्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात आले. पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ९३ टक्के इतकी आहे. लसींच्या तुटवड्यांमुळे पहिला आणि दुसरा डोस न मिळालेल्यांची संख्या दिसत आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत सुरक्षित वातावरणात शाळा भरविण्याचा प्रयत्न करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा