सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद न दिल्यामुळे नाराज झालेल्या आटपाडी तालुक्यातील मनीषा पाटील आणि तासगाव तालुक्यातील योजना शिंदे यांना सभापतीपद देऊन खूश करण्याची खेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून खेळली जाणार आहे़ वाळवा तालुक्यातून पपाली कचरे, तर कवठेमहांकाळमधून गजानन कोठावळे यांच्याही नावाची चर्चा आहे़ अध्यक्ष निवडीप्रमाणे अचानक या नावाम्ांध्ये बदल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही़जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे या पदावर वर्णी लावण्यासाठी मनीषा पाटील, तासगावमधून कल्पना सावंत, योजना शिंदे, स्नेहल पाटील यांचे प्रयत्न सुरू होते़ मागील निवडीवेळी तानाजी पाटील यांना पुढीलवेळी संधी देण्याचे आश्वासन दिले होते़ अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांचीच वर्णी लागणार, अशी चर्चा होती़ परंतु, अचानक गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील गणित मांडून जत तालुक्यातील रेश्माक्का होर्तीकर यांना अध्यक्षपदाची संधी दिली़ यामुळे तेथे विलासराव जगतापविरोधी गटाला पाठबळ मिळाले़ परंतु, मनीषा पाटील, सावंत, योजना शिंदे, स्नेहल पाटील या सदस्यांच्या मनात नेत्यांविरोधात खदखद आहे़ याचा उद्रेक विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत़ यातूनच मनीषा पाटील यांना बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. त्याद्वारे त्यांना विधानसभा निवडणुकीत अमरसिंह देशमुख यांचा प्रचार करायला लावण्याचा नेत्यांचा प्रयत्न असेल.तासगाव तालुक्यातून सावळजच्या कल्पना सावंत, मणेराजुरी गटातील योजना शिंदे आणि येळावीच्या स्नेहल पाटील याही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होत्या. त्यापैकी स्नेहल पाटील यांचे पती अनिल पाटील यांना घरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद दिल्यामुळे त्यांचे नाव चर्चेतून मागे पडले होते़ सावंत आणि शिंदे या दोन नावांची शेवटपर्यंत चर्चा होती़ अखेरच्या क्षणी दोन्ही सदस्यांना संधी न दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे़ सावंत अथवा शिंदे यांच्यापैकी एकीला महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाची संधी मिळणार आहे़ लिंबाजी पाटील यांच्या रूपाने वाळवा तालुक्याला उपाध्यक्षपद दिले असले, तरी पाटील यांचा परिसर शिराळा विधानसभा मतदारसंघात येतो यामुळे विधानसभेची गणिते बांधून वाळवा तालुक्याला आणखी एक सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे़ पपाली कचरे आणि मीना मलगुंडे यांच्या नावांची चर्चा आहे़ परंतु, मीना मलगुंडे यांचाही गट शिराळा विधानसभा मतदारसंघात येतो. कोठावळे यांना कृषी सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे़ नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीत ही नावे निश्चित केली आहेत़ (प्रतिनिधी)
‘झेडपी’त नाराजांना मिळणार सभापतीपद
By admin | Updated: September 23, 2014 23:54 IST