सांगली : बालकांना कुपोषण मुक्तीसाठी शून्य ते सहा वयोगटांतील बालकांच्या मातांना बालकांचे आहार व आरोग्याबाबत जिल्हा परिषदेने अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या कडक अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे सोमवारपासून जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सोमवार दि. १३ रोजी मिरज तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कुपोषणमुक्ती अभियानाचा आढावा घेणार आहेत.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे या सोमवारपासून जिल्हा दौऱ्यावर जाणार असून सोमवार दि. १३ रोजी मिरज तालुक्यातील टाकाळी, बुधवारी दि. १५ रोजी जत तालुक्यातील उमदी प्रकल्प, दोन वाजता जत प्रकल्पाला भेट देणार आहेत. गुरुवार दि. १६ रोजी सकाळी वाळवा प्रकल्प एक आणि दुपारी साडेबारा वाजता वाळवा प्रकल्प दोन तर दुपारी साडेतीन वाजता शिराळा प्रकल्पाला भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी, दि. १७ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता तासगाव तर दुपारी दोन वाजता आटपाडी प्रकल्पला भेट देणार आहेत. या दौऱ्यात संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी, बालप्रकल्प अधिकारी, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती आदींच्या उपस्थितीत पोषण महाअभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
चौकट
गंभीर आजारी बालकांवर तत्काळ उपचार
अंगणवाडीतील सर्व सेविका यांनी शून्य ते सहा वयोगटांतील बालकाने अचूक वजन व उंची घेऊन त्यांचे श्रेणीकरण कसे करावे, यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. पोषण अभियानातंर्गत अंगणवाडी सेविकांनी बालकाने वर्गीकरण करून कमी आजार आणि गंभीर आजारी बालकांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंभीर आजारी बालकांवर उपचार आणि योग्य आगार देऊन कुपोषणातून बाहेर काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी दिली.