मिरज : देशातील सद्य:स्थिती बदलायची असेल तर नागरिकांनी उदासीन राहून चालणार नाही, तरुण रक्त कृतिशील होणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार डॉ. भवाळकर व कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बुधाजीराव मुळीक यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारती विद्यापीठाच्या सभागृहात सोहळा पार पडला. यावेळी आमदार विश्वजीत कदम, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, पुरस्कार समितीचे राजीव जगताप, माजी आमदार दिलीप ढमढेरे, हरी चिकणे, सचिन बऱ्हाटे, माधवी पाटील, संजय बालगुडे, मंदार चिकणे, नाथाभाऊ कुदळे उपस्थित होते.तारा भवाळकर म्हणाल्या, बोली हा प्रकार मन व मेंदू मोकळे करतो. जगणे व पुस्तकी सिद्धांत यात आदानप्रदान राहिले तरच जगण्यातील गुंता सुटू शकतो. जगण्यातील सत्य व श्रमसंस्कृती सांगत संतांनी कर्मकांडाचा निषेध केला आहे. दक्षिण-उत्तर संस्कृती एकत्र आहे, त्यामुळे एकारलेपणाच्या आहारी न जाता समतोल ठेवला पाहिजे. लोक साहित्यातील ओवीत जगण्याला भिडणारा आशय आहे. ओव्यांमध्ये सामाजिक इतिहास व मोठे समाजशास्त्र आहे.
शेती संपली तर देश संपेलडॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, शेती संपली तर देश संपेल. देशात जमीन शेतकऱ्यांमुळेच शिल्लक आहे. यापुढे अर्बन ॲग्रिकल्चर आल्याने भिंतीवर शेती दिसेल. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यावर धोरणाची गरज आहे. उत्पादन खर्चावर आधारित कायदा आवश्यक आहे. जनता बोलत नाही म्हणून राज्यकर्त्यांचे फावते, त्यामुळे बोलायला शिका, असेही त्यांनी सांगितले.
लेखणीच्या सामर्थ्याची गरजज्येष्ठ कवी रामदास फुटाणे म्हणाले, तारा भवाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनात माणुसकीच्या जाणिवांची जाणीव राजकारण्यांना करून दिली. साहित्य संमेलन टिंगलीचा विषय व ओवाळणी होऊ नये. साहित्यिकांच्या लेखणीच्या सामर्थ्याची देशाला व महाराष्ट्राला गरज आहे. तुम्ही बोलत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. आत्मा सांगतो ते बोलले व लिहले पाहिजे, हे तारा भवाळकर यांच्याकडून आम्ही शिकलो.