अशोक डोंबाळे -सांगली -तासगाव सहकारी साखर कारखाना एक वर्षाच्या मुदतीने चालविण्यासाठी सहकारी संस्था आणि उद्योजक पुढे येत नाहीत. त्यामुळे कारखान्याचे धुराडे सलग दोन वर्षे बंद पडल्यामुळे सभासद, कामगारांचे हाल झाले आहेत. २०१५-१६ वर्षाचा गळीत हंगामही सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सभासद आणि कामगारांनी कारखाना चालू करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. कामगारांनी २००३-०४ मध्ये आर्थिक अडचणीवर मात करून गळीत हंगाम यशस्वी केला़ त्याच धर्तीवर ते कारखाना चालविण्यास तयार असून त्यासाठी राज्य बँकेने अर्थसाहाय्य करण्याची गरज असल्याचे कामगारांनी सांगितले.तासगाव कारखाना २००३-०४ मध्येही आर्थिक अडचणीत होता. कारखान्याचा गळीत हंगाम बंद राहिल्यास प्रश्न गंभीर होणार असल्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन हंगाम सुरु केला. त्यावर्षी राज्य बँकेने वेळेवर कर्जपुरवठा केला नसतानाही तासगाव कारखान्यास १४ कोटींचे उत्पन्न मिळाले़ हजार-दोन हजाराच्या तुटपुंज्या पगारावर कामगार राबले़ उसाला अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला़ कामगारांच्या या जिद्दीला सभासदांनीही सलाम ठोकला होता. मात्र दुसऱ्या हंगामाला राज्य बँकेने अर्थसाहाय्यच दिले नाही़ त्यामुळे २००४-०५ मध्ये पुन्हा कारखान्याचे धुराडे बंद राहिले़ राज्य बँकेच्या या भूमिकेवर कामगार नाराज आहेत़ २००५-०७ मध्ये कारखाना उगार शुगरकडे तीन कोटीच्या भाडेकराराने देण्यात आला़ त्यावेळी कारखान्याचे कर्ज ३४ कोटी होते़ आज तो बोजा १०८ कोटींवर गेला आहे़ हा बोजा वाढला की वाढविला, अशीही शंका व्यक्त होत आहे़तासगाव कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात असून, श्री गणपती जिल्हा कृषी औद्योगिक संघाला १४ कोटी ५१ लाखांना तो विकला होता. हा विक्री व्यवहार रद्द करण्यासाठी कारखान्याच्या अवसायकांनी ऋण वसुली प्राधिकरण (डीआरटी) व उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे तासगाव कारखाना दीर्घ मुदतीच्या भाड्याने देता येत नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. म्हणूनच दरवर्षी राज्य बँकेकडून कारखाना चालविण्यासाठी एक वर्षाच्या मुदतीची निविदा प्रसिध्द होत होती. प्रत्यक्ष एक वर्षाच्या मुदतीने कारखाना चालविण्यास कुणीही पुढे येत नाही. यातूनच दोन वर्षापासून ऊसपट्ट्यातील तासगाव कारखान्याचे धुराडे बंद पडले आहे. कामगारांवर मजुरीला जाण्याची वेळ आली आहे. सलग दोन वर्षे गळीत हंगाम बंद राहिल्यामुळे कामगारांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. सभासदांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नाही. तासगाव कारखान्याकडे २७ हजार सभासद संख्या असून त्यांना ऊस अन्य कारखान्यांकडे पाठविताना त्रास होतो. उसाचे वेळेवर गळीत होत नसून, पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे सभासद, कामगारांच्या हितासाठी राज्य बँकेने पावले उचलावीत, अशी सभासद, कामगारांची मागणी आहे. सभासदांनी मनावर घेतल्यास क्षणात १३ कोटी जमा होतीलतासगाव कारखाना सभासद आणि कामगारांच्या हितासाठी चालू राहिला पाहिजे. कारखान्याची विक्री करून नव्हे, तर भाडेतत्त्वावरच तो चालला पाहिजे. राज्य बँकेने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत दोन ते तीन वर्षाच्या दीर्घ मुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास काही हरकत नाही. तेही बँकेला जमत नसेल, तर त्यांनी सभासद, कामगारांकडे कारखाना चालू करण्यासाठी सोपविल्यास आम्ही गळीत हंगाम सुरु करू शकतो, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सभासदांनी मनावर घेतल्यास १३ कोटींचा निधी क्षणात गोळा होऊ शकतो. सध्या सभासदांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांचे समभाग (शेअर्स) आहेत. सहकार कायद्याच्या नवीन दुरुस्तीनुसार शेअर्सची किंमत प्रत्येकी दहा हजार झाली आहे. २७ हजार सभासदांकडून प्रत्येकी पाच हजार गोळा केल्यास १३ कोटी ५० लाख जमा होतील.सभासदांनी मनावर घेतल्यास क्षणात १३ कोटी जमा होतीलतासगाव कारखाना सभासद आणि कामगारांच्या हितासाठी चालू राहिला पाहिजे. कारखान्याची विक्री करून नव्हे, तर भाडेतत्त्वावरच तो चालला पाहिजे. राज्य बँकेने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत दोन ते तीन वर्षाच्या दीर्घ मुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास काही हरकत नाही. तेही बँकेला जमत नसेल, तर त्यांनी सभासद, कामगारांकडे कारखाना चालू करण्यासाठी सोपविल्यास आम्ही गळीत हंगाम सुरु करू शकतो, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सभासदांनी मनावर घेतल्यास १३ कोटींचा निधी क्षणात गोळा होऊ शकतो. सध्या सभासदांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांचे समभाग (शेअर्स) आहेत. सहकार कायद्याच्या नवीन दुरुस्तीनुसार शेअर्सची किंमत प्रत्येकी दहा हजार झाली आहे. २७ हजार सभासदांकडून प्रत्येकी पाच हजार गोळा केल्यास १३ कोटी ५० लाख जमा होतील.
‘तासगाव’ चालविण्यासाठी कामगार, सभासद सरसावले
By admin | Updated: May 19, 2015 00:25 IST