इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथे लग्नाला २३ वर्षे होेऊन गेल्यावरही पतीकडून पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रोहिणी राजेंद्र गाडवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेंद्र चंद्रकांत गाडवे (वय ४६) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
राजेंद्र गाडवे छायाचित्रकार आहे. जून १९९९ मध्ये त्याचा रोहिणीशी विवाह झाला आहे. लग्नानंतर वर्षभरापासून हे दोघे पती-पत्नी आई-वडिलांपासून विभक्त राहत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, तरीही राजेंद्र गाडवे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला शिवीगाळ करत होता. मुलांसह सर्व नातेवाइकांनी समजून सांगितल्यावरही राजेंद्रने कोणाचे ऐकले नाही. त्याचा त्रास असह्य झाल्याने रोहिणी यांनी फेबुवारीत महिला समुपदेशन केंद्रात लेखी तक्रार दिली. पतीकडून धोका असल्याने माहेरी राहणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्या सातारा जिल्ह्यातील कटगूण येथे माहेरी राहत होत्या. मात्र, ७ जून रोजी राजेंद्र याने कटगूण येथे जाऊन पत्नी रोहिणीला मारहाण व शिवीगाळ केली होती.