विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : मुलगी म्हणजे धनाची पेटी, या म्हणीप्रमाणे शिराळा व कडेगाव येथील शहा कुुटुंबीयांच्या घरी आलेल्या नव्या पाहुणीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हा स्वागत सोहळा सूर्यकांत शहा (शिराळा) व संध्या शहा (कडेगाव) यांच्या दोन्ही घरांत उत्साहात पार पडला.
शिराळा येथील प्रणाली व पार्थ शहा व कडेगाव येथील निखिल व मनाली शहा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. प्रणाली शहा व निखिल शहा हे दोघे मावस भाऊ-बहीण आहेत. विशेष म्हणजे शिराळाच्या शहा कुटुंबीयांच्या घरी २५, तर कडेगावच्या शहा कुटुंबीयांच्या घरी ५५ वर्षांनी मुलीचा जन्म झाला. यामुळे दोन्ही कुटुंबीयांसाठी हा सुवर्ण योगच म्हणावा लागेल.
शिराळा व कडेगाव येथे स्वागतावेळी घरापासून पन्नास फूट लांब फुलांच्या चादरीच्या पायघड्या घालण्यात आल्या. स्वागताचे फलक लावले, तांदळाचा तांब्या ओलांडून व कुंकवाच्या पावलांनी दोन्ही कन्यांचा गृहप्रवेश करण्यात आला.
यावेळी सूर्यकांत शहा, माजी ग्रामपंचायत सदस्या विजयमाला शहा, चांदणी शहा, विपुल शहा, लीना शहा, पार्थ शहा, विशाल शहा, काजल शहा, वैभव शहा, विवेक शहा, तर कडेगाव येथे फुलचंद शहा, संध्या शहा, नीतल शहा, भाविका शहा, अनिल शहा, आदी उपस्थित होते.
चौकट
रुग्णांना बर्फी वाटप
कडेगाव येथील शहा कुटुंबात ५५ वर्षांनी मुलगी झाली. या आनंदाच्या क्षणी शहा कुटुंबीयांनी कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण यांना बर्फी वाटली.