सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्याला रोखण्यासाठी प्रभावी औषध नसल्याने सध्यातरी मास्क हेच बचावाचे साधन बनले आहे. कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासून आता कपड्याइतकाच मास्कही शरीराचा एक भाग बनला आहे. तर सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डबल मास्क वापरण्याचा ट्रेंड अधिक प्रभावी ठरत आहे. योग्य आणि डॉक्टरांच्या निर्देशानुसार डबल मास्क वापरल्यास कोरोनाचा संसर्ग रोखता येऊ शकतो.
नाक, तोंड आणि डोळ्यांवाटे कोरोनाचे विषाणू शरीरात प्रवेश करण्याची शक्यता अधिक असल्याने मास्क वापरासाठी जनजागृती करण्यात येत आहे. अगदी घरात तयार केलेल्या कॉटन मास्कपासून ते एन ९५ मास्क, डबल लेयर सर्जिकल मास्क, ट्रीपल लेयर सर्जिकल मास्क वापरण्याकडे कल वाढला आहे. मास्क वापरताना दोन्हीही मास्क सर्जिकल व दोन्ही मास्क कपड्यांचे असे वापरू नयेत. घराबाहेर पडताना नागरिकांनी डबल मास्क नेहमी वापरल्यास त्याचा प्रभाव दिसून येणार आहे.
चौकट
योग्य मास्क असा ओळखा
वर्षभरापूर्वी केवळ वैद्यकीय कारणांसाठी वापर होणारा हा मास्क आता प्रत्येकाच्या पेहरावाचा भाग बनला आहे. यातही कोणता मास्क चांगला किंवा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरतो यासाठी काही छोट्याशा टिप्स आहेत. त्यानुसार आपल्या घरात सुरू असलेल्या कोणत्याही दिव्यासमोर, बल्बसमोर मास्क धरून पहावा त्यातून तो प्रकाश दिसत नसल्यास तो वापरासाठी योग्य आहे. याशिवाय आणखीही एक प्रयोग करता येतो त्यानुसार मेणबत्ती लावून ती मास्क लावून फुंकण्याचा प्रयत्न करावा. ती लगेचच विझल्यास त्यातून श्वासाचे प्रसरण होते हे सिद्ध होते त्यामुळे असा मास्क वापरू नये अथवा डबल मास्क वापरावा.
चौकट
असा वापरावा मास्क
* बाहेर फिरताना ट्रीपल लेयर सर्जिकल मास्कचा वापर करावा. कोरोना बाधिताचा संपर्क येण्याची किंवा त्या परिसरातून जाण्याची शक्यता असल्यास एन ९५ मास्क योग्य असतो.
* डबल लेयर कापडी मास्कचा वापरही प्रभावी ठरतो. फक्त या मास्कने संपूर्ण तोंड, नाक झाकले जाते की नाही याची खात्री करून घ्यावी.
* अनेकजण हनुवटीवर मास्क ठेवतात व पुन्हा नाकावर घेतात. यामुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.
* कापडी मास्कच्या सोबतीला सर्जिकल मास्क वापरल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. मास्क वापरताना आपल्या शरीराची रचना, श्वासोच्छवास याचीही रचना लक्षात घेऊनच मास्कचा वापर करावा.
कोट
साधा कापडी मास्क वापरणार असाल तर तो तिहेरी असावा. सर्जिकल मास्कवरही कापडी मास्क असल्यास कधीही योग्य ठरते. नव्या संशोधनानुसार कोरोनाचे विषाणू हवेतूनही पसरतात असे स्पष्ट झाले आहे. यामुळे मास्कचे महत्त्व अत्यंत वाढले आहे. कापडी मास्क एकेरी कापडाचा शक्यतो टाळा. तसेच त्यामध्ये कोठूनही हवा येणार नाही असा बंदिस्त असावा.
डॉ. प्रिया प्रभू-देशपांडे, जिल्हास्तरीय टास्क फोर्स सदस्य
कोट
मास्कच्या वापराबाबत वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी हनुवटीवर तोंड व नाक उघडे राहील असा मास्क वापरू नये तर संपूर्ण भाग झाकला जाईल याची काळजी घ्यावी. दररोज स्वच्छ मास्क वापरावा. चांगल्या दर्जाचा मास्क वापरल्यास संसर्गाचा धोकाही कमी होण्यास मदत होत असते.
डॉ. शीतल धनवडे, आरोग्याधिकारी, सांगली