विटा : गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील श्री साई रुग्णालयावर तरुणांनी दगडफेक केल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) शहरातील डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी मूक मोर्चा काढून काळ्या फिती लावून आंदोलन केले. मोर्चावेळी डॉक्टरांनी आ. अनिल बाबर, नगराध्यक्ष वैभव पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार अभिजित राऊत, पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांना निवेदन देऊन वैद्यकीय व्यवसायाला सुरक्षा देण्याची मागणी केली. दि. २ एप्रिलरोजी रात्री येथील अमर शितोळे यांच्या आई सुमन यांच्यावर उपचार करण्यासाठी साई रुग्णालयाचे डॉ. अविनाश लोखंडे वेळेत न आल्याने रुग्णालयावर दगडफेक करून डॉ. लोखंडे यांना मारहाण करीत सुमारे तीन लाखांचे नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी विटा पोलिसांत सहाजणांवर गुन्हा दाखल आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी साई रुग्णालयापासून डॉक्टरांनी मूक मोर्चा काढला. हा मोर्चा शिवाजी चौक, तासगाव रस्ता, उभी पेठ, प्रसाद चित्रमंदिर, चौंडेश्वरी चौकमार्गे तहसील कार्यालयाजवळ आला. त्यापूर्वी डॉक्टरांनी आ. बाबर, नगराध्यक्ष पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिसांना निवेदन दिले. मोर्चात डॉ. मानाजी कदम, डॉ. जयवंत पाटील, डॉ. नरेन म्हेत्रे, डॉ. वैभव माने, डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. सौ. सुवर्णा लोखंडे, डॉ. चंद्रकांत मगदूम, डॉ. प्रताप वलेकर, डॉ. अवधूत बापट, डॉ. राजेंद्र लावंड, डॉ. विशाल नलवडे, डॉ. एल. एस. कुंभार, डॉ. अनिल पाटील, डॉ. प्रताप काटकर, डॉ. सुनंदा बिराजदार, डॉ. दीपक शहा, डॉ. अजित शहा, डॉ. सचिन माळी, डॉ. दीपक कुलकर्णी, गिरीश शरनाथे यांच्यासह मेडिकल असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते. (वार्ताहर)
विट्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा
By admin | Updated: April 5, 2015 00:05 IST