येरळवाडी धरण फोटो
शीतल पाटील
कृष्णा नदीची सर्वांत लांब उपनदी म्हणून येरळा नदीचा उल्लेख होतो. प्राचीन काळी ही नदी ‘वेदवती’ या नावाने ओळखली जात असे. भगवान श्रीराम यांच्या अनेक ऋषींनी या नदीकाठावर वेदपठण केल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर, या नदीला ‘येरळा’ हे नाव रूढ झाले.
येरळा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोलकनाथ टेकडीवर झालेला आहे. येरळा नदी वर्धनगडने वेढलेल्या रांगेतून वाहत जाते आणि नदीच्या डाव्या बाजूस महिमानगड रांग आहे. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुके खटाव, खानापूर, तासगाव आणि पलूस तालुक्यांतील लोकांची जीवनदायिनी आहे. येरळा नदी ही सहामाही वाहिनी असून, इतर सहा महिने नदीचे पात्र कोरडे असते. या नदीवर नेर आणि येरळवाडी ही दोन लहान ब्रिटिशकालीन धरणे आहेत. येरळा नदी खोऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ ३०४१ चौ.कि.मी. असून, नदीची लांबी १२५ कि.मी. इतकी आहे. येरळा नदीची ‘नांदणी’ ही उपनदी आहे. सांगली जिल्ह्यातील ‘ब्रह्मनाळ’ येथे येरळा नदीचा कृष्णा नदीशी संगम होतो.
चौकट
अशी आहे आख्यायिका
फलटण तालुक्यातील (दंडकारण्य) ताथवडे घाटातील (खटाव- माण) पहिला डोंगर म्हणजे म्हसकोबाचा डोंगर होय. कुळकजाई, खटाव-माण तालुक्याच्या सरहद्दीवर पुरातनकाळी भगवान श्रीराम वेदपठण करीत होते. त्या वेळी लक्ष्मणाने सीतामाईला श्रीरामाजवळ नेऊन सोडले होते. त्यावेळेस लक्ष्मणाने सीतामाईच्या उशाशेजारी एक गरम पाण्याने भरलेला व एक गार पाणी असलेला असे दोन द्रोण ठेवले होते. पूर्व दिशेचा द्रोण म्हणजे माणगंगा, तर उत्तरेचा द्रोण बाणगंगा अशी नदींची त्या काळी नावे होती, नंतर श्रीराम यांनी या ठिकाणी वेदपठण केल्याने बाणगंगेला ‘वेदावती’ असे नाव पडले, तर सीतामाईंनी ‘येरळा’ नदीचे रूप धारण केल्याची आख्यायिका आहे.