सहदेव खोत - पुनवत -जिल्ह्यात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल सुरू असताना, दुसरीकडे मात्र शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात वारणा डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. या कालव्याच्या २७ कि.मी.पर्यंतच टप्प्यात गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी धबधबे पाहावयास मिळत असून, ओढे, नोलेही तुडुंब वाहत आहेत.वारणा डाव्या कालव्यात ० ते २७ कि.मी.च्या टप्प्यात सध्या पाणी सोडले आहे. या टप्प्यातील कालव्याच्या गळतीची समस्या जुनीच आहे. कालव्यात पाणी सोडले की ते हजारो ठिकाणांहून झिरपून शेतकऱ्यांच्या शेतातून ओढ्या-नाल्यांना मिळत आहे. त्यामुळे खुजगावपासून ते चांदोलीपर्यंतच्या भागात तर नाले-ओढे सध्या ऐन उन्हाळ्यात ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी छोटे-मोठे धबधबे नजरेस पडत आहेत. सततच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणकणसे उगवली आहेत. सध्या कालवा प्रवाही असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातपेरणीसाठी तयार केलेली शेते पाण्याने भरली आहेत. उसाची शेते तुडुंब झाल्याची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. ही दृश्ये पाहिल्यानंतर चांदोलीला भेट देणारे पर्यटक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.कालव्याला पाणी आले की असंख्य एकरातील शेती पाण्याने भरते, तर काही ठिकाणी ओल येते. पाणी बंद झाल्यावर शेते सुकू लागल्यावर काही तरी करावे म्हटले, तर पुन्हा कालव्याला पाणी येते. अशा परिस्थितीत आमचे शेत पिकणार कसे? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.कालव्यात पाणी सोडल्यानंतर काही लोकांचा फायदा होत असला तरी, ज्यांची शेती या कालव्यामुळे बुडाली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हा कालवा कर्दनकाळ ठरत आहे. गळतीमुळे जिल्ह्याच्या एका टोकाला घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा, तर पश्चिम टोकाला पाण्याचा अपव्यय, असा विरोधाभास पाहावयास मिळत आहे. आमचे शेत पिकणार कसे?अनेक वर्षांपासून कालव्याची गळती काढण्याबाबत कोणतीही कामे झालेली नाहीत. पाटबंधारे विभाग याबाबत नेहमीच उदासीन राहिला आहे. सध्या वारणा डाव्या कालव्यात ० ते २७ कि.मी.च्या टप्प्यात पाणी सोडले आहे. कालव्याला पाणी आले की असंख्य एकरातील शेती पाण्याने भरते, तर काही ठिकाणी ओल येते. सध्या कालवा प्रवाही असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातपेरणीसाठी तयार केलेली शेते पाण्याने भरली आहेत. उसाची शेते तुडुंब झाल्याची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. पाणी बंद झाल्यावर शेते सुकू लागल्यावर काही तरी करावे म्हटले, तर पुन्हा कालव्याला पाणी येते. अशा परिस्थितीत आमचे शेत पिकणार कसे? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
शिराळ्यात वारणा कालव्यास गळती
By admin | Updated: May 25, 2015 00:29 IST