सांगली/हरिपूर : शिवाजी विद्यापीठाकडून यंदा काही विभागांचे निकाल उशिरा जाहीर झाल्याने विद्यापीठ सचिवपदाच्या (युआर) निवडणुका लांबल्या आहेत. स्टुडंटस् कौन्सिलने प्रत्येक महाविद्यालयाला दोनच दिवसांपूर्वी निवडणुकांचे वेळापत्रक पाठविले आहे. दि. ४ आॅगस्टला विद्यार्थी प्रतिनिधी (सीआर) पदाच्या निवडी जाहीर करण्यात येणार आहेत, तर सचिव पदासाठी दि. १४ आॅगस्टरोजी मतदान होणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांना राजकीय गुलाल नको, म्हणून काही वर्षांपासून विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणूक प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात प्रथम येणाऱ्याला विद्यार्थी प्रतिनिधीचा मान देण्यात येतो. याशिवाय प्राचार्यनियुक्त दोन, राष्ट्रीय सेवा योजनेतून एक, जिमखाना एक आणि सांस्कृतिक विभागातून एका प्रतिनिधीला सचिव पदाच्या निवडणुकीत सहभागी होता येते. युआर निवडणुकांमुळे कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या गटातटाचे राजकारण बहरत आहे. युआर (युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणजे ‘विद्यापीठ प्रतिनिधी’ आणि सीआर (क्लास रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणजे ‘वर्ग प्रतिनिधी’. चार आॅगस्टला सर्व महाविद्यालयांमध्ये सीआरच्या याद्या जाहीर होतील. चौदा आॅगस्टला युआर निवडणूक होईल. सांगली आणि परिसरातील महाविद्यालयांत भारतीय विद्यार्थी संसद, एनएसयुआय, अभाविप, छात्रभारती, एसएफआय आदी विद्यार्थी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनीही शड्डू ठोकला आहे. सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई वालचंद, गणपतराव आरवाडे, विलिंग्डन, चिंतामणराव, एन. डी. पाटील नाईट कॉलेज, एन.एस. लॉ, न्यू लॉ, मथुबाई गरवारे, राजमती, वालचंद अभियांत्रिकी, वसंतदादा अभियांत्रिकी, आप्पासाहेब बिरनाळे, वसंतदादा मॅनेजमेंट, डॉ. पतंगराव कदम, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे (मिरज) व कन्या महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा माहोल आहे. विद्यार्थी प्रतिनिधींची ४ आॅगस्टला निवड झाल्यानंतर वातावरण आणखी तापेल. जेवणावळी, सिनेमांची तिकिटे, सहली, कॅन्टीनमध्ये चहा-नाष्टा यासह विविध ‘पॅकेजेस’ इच्छुकांकडून दिली जात आहेत.
कॅम्पसमध्ये युआर निवडणुकीचा माहोल
By admin | Updated: August 1, 2014 23:27 IST