सांगली : येथील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा १०७ गर्भपात केल्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्टरांना आज (शुक्रवार) शहर पोलिसांनी अटक केली. डॉ. अर्जुन दत्ताजीराव पाटील (वय ४३), त्यांच्या पत्नी व मॅटर्निटीच्या प्रमुख डॉ. सुषमा अर्जुन पाटील (३२) व डॉ. माधुरी विजय जाधव (४७, सर्व रा. आंबेडकर रस्ता, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने श्री मॅटर्निटीवर छापा टाकला होता. यामध्ये केलेल्या तपासणीत १०७ गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. वैद्यकीय गर्भ सामग्री अधिनियमानुसार डॉक्टर पाटील दाम्पत्य, डॉ. माधुरी जाधव व डॉ. संतोष जयपाल पाटील यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हॉस्पिटलमधील सोनोग्राफी यंत्र सील करण्यात आले होते. ज्या महिलांचे गर्भपात करण्यात आले आहेत, या सर्व महिलांच्या नावांची नोंद आहे. त्यांचे पत्ते व भ्रमणध्वनी क्रमांकही आहेत. आतापर्यंत पोलिसांनी यातील पन्नासहून अधिक महिलांशी संपर्क साधला आहे. या महिलांनी कोणत्या कारणासाठी गर्भपात केला, याची माहिती घेतली जात आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस तपास करीत आहेत. गर्भपात केलेल्या काही महिलांना जबाब घेण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: तपासात लक्ष घातले आहे. आज सकाळी पाटील दाम्पत्यासह माधुरी जाधव यांना अटक करण्यात आली. त्यांना दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. (प्रतिनिधी)पुरावा मिळाला नाहीज्या १०७ महिलांचे गर्भपात करण्यात आले, त्यांनी मुलगी होती म्हणून गर्भपात केले का? याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. यासंदर्भातील एकही पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या रुग्णालयाला गर्भपात करण्याची शासकीय मान्यता आहे. गर्भपाताचे रेकॉर्ड पाटील दाम्पत्याने अपडेट ठेवले नसल्याचे आढळून आले आहे.
सांगलीत तीन डॉक्टरांना अटक
By admin | Updated: August 23, 2014 00:06 IST