इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता.वाळवा) येथे उसनवार पैसे परत मागणाऱ्या मेहुण्यावर कोयत्याने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हल्ल्याची ही घटना ६ मे रोजी सायंकाळी घडली होती.
जखमी निवास दिनकर पवार (वय ३५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. संशयित अमोल बाबू चव्हाण, मनोज बाबू चव्हाण आणि स्वप्निल ऊर्फ नाना बाबू चव्हाण (सर्व, रा. भवानीनगर, ता. वाळवा) यांना अटक करण्यात आली आहे. निवास पवार यांनी फेब्रुवारी महिन्यात अमोल चव्हाण याला दवाखान्याच्या कामासाठी २२ हजार रुपये उसनवार दिले होते. या पैशांची मागणी केल्यावर अमोल हा टाळाटाळ करत होता. ६ मेच्या सायंकाळी तिघा भावांनी कि. म. गड येथे येऊन निवास पवार यांच्यावर जिवघेणा हल्ला चढविला. हवालदार उत्तम माळी अधिक तपास करीत आहेत.