सांगली : शिराळा, वाळवा, मिरज, तासगाव या तालुक्यांसह सांगली शहरात पावसाची रिमझिम सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आज, गुरुवारी पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत या ठिकाणी १४७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, धरण ९0.१४ टक्के भरले आहे. ४७२२ क्युसेकने विसर्ग चालू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. संततधार पावसाने जिल्ह्यत आजही घरांची पडझड झाली. सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा मुक्काम कायम आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात होत आहे. याठिकाणी एकूण ६१९ मि.मी. पावसाची नोंद आहे. धरणातून गेल्या दोन दिवसांपासून विसर्ग चालू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मांगले-काखे, कोकरुड-रेठरे, मांगले-सावर्डे हे पूल अद्यापही पाण्याखाली आहेत. या पुलांवरील वाहतूक ठप्प आहे. तालुक्यातील नदीकाठची भातपिके पाण्याखाली आहेत. घेवडा, तीळ, चवळी, मका आदी पिकांवरही पावसाचा परिणाम होणार आहे. सोयाबीन व भुईमूग पिके फुलधरणीवर आहेत. जास्त पाण्याचा फटका त्यांना बसू शकतो. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिराळा तालुक्यातील पुनवत, चरणसह मिरजेमध्ये घरांची पडझड झाली आहे. (प्रतिनिधी)
चांदोली परिसरात अतिवृष्टी कायम
By admin | Updated: August 1, 2014 00:35 IST