सांगली : समडोळी येथून वारणा नदीतून सांगली व कुपवाडला पाणी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेची निविदा येत्या आठवडाभरात प्रसिद्ध करा, असे आदेश सत्ताधारी काँग्रेसचे नेते व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी आज पालिकेतील बैठकीत दिले. वारणा योजनेचा ७९ कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. निधीच्या मंजुरीपूर्वी ठेकेदारांकडून बँक गॅरंटी घेऊन कामाला सुरूवात करण्याची सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, आजच्या बैठकीत खड्डे, चरी, पाणीपुरवठ्यासह शासकीय निधीतील कामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती राजेश नाईक, आयुक्त अजिज कारचे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत वारणा योजनेवर बराच खल झाला. आयुक्त कारचे यांनी ७९ कोटीचा फेरप्रस्ताव सादर केला असल्याचे सांगितले. त्यात समडोळी येथून साडेअकरा किलोमीटरची पाईपलाईन, सबस्टेशन, इंटकवेल, कृष्णा नदीवर पुल यांचा समावेश आहे. मदन पाटील यांनी योजनेला केंद्राची मंजुरी आहे, नव्याने मंजुरी कशासाठी घ्यायची? असा सवाल करीत आम्ही मंजुरी आणणार नाही. पूर्वीच्या महाआघाडीने व अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत. त्या त्यांनीच निस्तराव्यात. पाण्याचा पत्ता नसताना नको तिथे पाईपलाईन, टाक्या बांधल्या, अशा शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली.वारणेच्या फेरप्रस्तावाचा निधी येईपर्यंत पालिकेने निविदा प्रसिद्ध करून कामाला सुरुवात करावी. त्यासाठी ठेकेदारांकडून बँक गॅरंटी घ्यावी. तसेच निधी मिळेल तसे ठेकेदारांचे पैसे द्यावेत, अशी सूचना केली. पाणीपुरवठा विभागाकडे नव्याने दाखल झालेले उपअभियंता गिरीबुवा यांची उलटतपासणीही घेतली. सांगलीवाडीतील कामे सुरू झाली का? असा सवालही पाटील यांनी शहर अभियंता शेजाळे यांना केला. नगरसेवक दिलीप पाटील, पांडूरंग भिसे यांनी सांगलीवाडीत एकही काम सुरू झाले नसल्याची तक्रार केली. त्यावर पाटील यांनी शेजाळेंची खरडपट्टी केली. मृणाल पाटील यांनी चरी मुजविल्याचे काम संथगतीने सुरू असल्याचे सांगितले. बाळासाहेब काकडे यांनी मुख्य बाजारपेठेतील चरी अद्यापही बुजविल्या नसल्याची तक्रार केली. हणमंत पवार यांनी दहा महिन्यापूर्वी निविदा प्रसिद्ध होऊनही अद्याप मंजुरी मिळत नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बँक गॅरंटीवर वारणा पाणी योजनेची निविदा
By admin | Updated: August 1, 2014 23:27 IST