सांगली : तासगाव येथील बसस्थानक परिसरातील व्यापारी संकुल परिसरातून दुचाकी चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाने गजाआड केले. किरण दिनकर शिंदे (वय २४, रा. इंदिरानगर, सध्या रा. सावळज, ता. तासगाव) असे त्याचे नाव आहे. त्याचा भाऊ सूरज पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. शिंदे याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
दुचाकी चोरणाऱ्यांची माहिती काढून कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले. पथकातील पोलीस तासगाव विभागात गस्तीवर होते. त्यावेळी किरण शिंदे विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार अटक करण्यात आली आहे. त्याच्या भावाचाही यात सहभाग असल्याचे समोर आले. तो पसार असून, शोध सुरू आहे.