दत्ता पाटील -- तासगाव --तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राला माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता या नामकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला असून भाजप आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्रास राजकीय व्यक्तीचे नाव देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नामकरण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात तुरचीसारख्या फोंड्या माळावर पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारुन, तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या वैभवात भर घातली. पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर या प्रशिक्षण केंद्रास आबांचे नाव देण्याबाबतचा विषय ऐरणीवर आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणीनुसार, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या केंद्रास आबांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, तर दस्तुरखुद्द पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही प्रशिक्षण केंद्रातील एका कार्यक्रमावेळी, आबांचे नाव देण्याबाबत अनुकूलता दाखवली होती.दरम्यान, पोलीस प्रशिक्षण केंद्रास राजकीय व्यक्तीचे नाव देऊ नये, असा अजेंडा घेऊन भाजप आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे. अर्थात राजकीय व्यक्तीच्या विरोधामागे आर. आर. पाटील यांच्याच नावाची पार्श्वभूमी आहे, हे उघड सत्य आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश असणाऱ्या लोकसेवा फौंडेशनने शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे, तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या नामकरणावरुन तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय कुरघोड्या सुरु झाल्या असून, याबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांची, तसेच शासनाची भूमिका काय असेल? याची उत्सुकता लागून आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व आदर्शवादी होते. त्यामुळेच त्यांचे नाव तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रास द्यावे, अशी मागणी केली आहे. राजकीय व्यक्तीचे नाव देण्याचा पायंडा पडल्यास, सर्वच पक्षांकडून त्याचे राजकारण होऊ शकते. त्यामुळे आमचा राजकीय व्यक्तीचे नाव देण्यास विरोध आहे. - संदेश भंडारे,जिल्हाध्यक्ष, आरपीआय.पोलीस प्रशिक्षण केंद्रास आबांचे नाव द्यावे, अशी शिफारस खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच केली होती. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ठरावदेखील झाला आहे. हे केंद्र उभारण्यात आबांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे नामकरणावरुन राजकारण व्हायला नको. - हणमंत देसाई, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी.पोलीस प्रशिक्षण केंद्रास शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी लोकसेवा फौंडेशनच्यावतीने गृहराज्यमंत्री राम शिंंदे यांच्याकडे केली आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव या केंद्रास देऊ नये, अशी विनंतीही मंत्री शिंंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसे झाले तर फौंडेशनच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल.- नितीन पाटील, लोकसेवा फौंडेशन, भाजप.
तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रास राजकीय रंग
By admin | Updated: January 30, 2016 00:13 IST