सांगली : अतिवृष्टीमुळे ५० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित सोयाबीन शेतातून विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरले आहेत. आणखी किती दर खाली येणार हे माहीत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे जबर फटका बसला आहे.
भारत सरकारने विदेशातून १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळले आहेत. सोयाबीनला ऑगस्टमध्ये प्रतिक्विंटल ८९४६ रुपये दर होता. सरकारने सोयाबीनची आयात करताच दि.२५ सप्टेंबररोजी ५७५० रुपये दर झाला आहे. क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरला आहे. दरातील या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.
चौकट
सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल
महिना दर
जानेवारी २०२० : ४२१३
जून २०२० : ३८१४
ऑक्टोबर २०२० : ३९४४
जानेवारी २०२१ : ५०५८
जून २०२१ : ७१३०
सप्टेंबर २०२१ : ५७५०
चौकट
सोयाबीन पेरणी हेक्टरमध्ये
२०१८ : ५८८००
२०१९ : ५७१६१
२०२० : ४५१००
२०२१ : ५१७५५
चौकट
खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करु ?
कोट
अतिवृष्टीतून थोडेच सोयाबीनच पीक हाती लागले आहे. शेतात उभे असताना आठ-नऊ हजाराचा दर होता. आता काढणी करावयाची आहे, तर दर अर्ध्यावर आला आहे. आजच्या दरामध्ये वीस हजारही येणार नाहीत. पेरणीचा खर्चही निघणार नाही, परिस्थिती आहे.
- श्रीअंश लिंबीकाई, शेतकरी.
कोट
सध्या सोयाबीनचा दर पाच हजाराच्या आसपास आहे. यास काढायला साडेचार हजार रुपये लागत आहेत. मळणीही महागली आहे. दर वाढला म्हणून मजूर जादा पैसे घेत आहेत. असे असताना सोयाबीन तर कमी दरात विक्री होत आहे. प्रत्येक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाची शिक्षा भोगत आहे.
- विष्णू कदम, शेतकरी.
चौकट
विकण्याची घाई करू नका!
कोट
भारत सरकारने विदेशातील १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. सध्या नवीन सोयाबीचीही आवक चालू झाली आहे. या सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमी दराने खरेदी होत आहे.
-महावीर पाटील, व्यापारी.
कोट
बाजारभावाची चढ-उतार सामान्य व्यापाऱ्यांच्या आकलनाबाहेरची आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत होता, तोपर्यंत केंद्र सरकारने आयात केली. यामुळे आठवड्यात अडीच हजाराने दर उतरले आहेत. भविष्यातील दराचेही काहीच सांगता येत नाही. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करु नये.
-महादेव कोरे, व्यापारी.