सुरेंद्र शिराळकर -आष्टा -वाळवा तालुक्यातील आष्टा, बागणी, चिकुर्डेसह करंजवडे, देवर्डे, ठाणापुडे आदी परिसरात सोयाबीन काढणीला चांगलाच वेग आला आहे. मात्र मॉईश्चरच्या नावाखाली शेतकऱ्यांची दरामध्ये फसवणूक केली जात आहे. सोयाबीनला चार दिवसापूर्वी प्रति क्विंटल सोयाबीनला तीन हजार ८०० रूपये दर होता. लगेच यामध्ये आठशे रूपयांनी दर कमी होऊन सध्या प्रति क्विंटल तीन हजार रूपये झाला आहे. उसाच्या दराचा गोंधळ लक्षात घेऊन शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला आहे. हे पीक अवघ्या ९२ ते ९५ दिवसांचे असल्याने अल्प कालावधित चांगली कमाई होते. त्यातच हे पीक आंतरपीक म्हणून घेता येत असल्याने आष्टा, बागणी, दुधगाव, वाळवा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या भोंड्यावरती सोयाबीनची लागवड केलेली आहे. काही दिवसांच्या अंतरावर ‘दिवाळी’ हा सण आल्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळावा, अशा अपेक्षा शेतकरी वर्गाच्या आहेत. शेतकऱ्यांच्या या अपेक्षांवर व मागणीवर व्यापारी वर्गाने कुऱ्हाड घातली आहे. व्यापाऱ्यांच्या या खेळीमुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत. सोयाबीन सौद्याच्यावेळी दर तीन हजार ८00 रुपये निघाला. हा दर फक्त सुरुवातीच्या पूजन झालेल्या ५ पोत्यांसाठीच होता. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात हा दर तीन हजार ५00 रुपयांवर आला. लगेच दोनच दिवसात हा दर तीन हजार ३00 रुपयांवर आला. आता तर तो दर तीन हजार रुपयांवर येऊन स्थिरावला आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादक मालाची किंमत वाढविण्यासाठी अनेक दिवस नव्हे, तर अनेक हंगाम घालवले जातात. त्यासाठी अनेक समित्या नेमून त्यांच्यावर अभ्यास केला जातो. या समित्यांमधील अभ्यासक मंडळींचा शेतीचा, शेतातील मातीचा व सोयाबीनचा कधीही संपर्क आलेला नसतो. नोंदवह्यांतील कागदावर आकडेमोड करून ही समिती सोयाबीन किंवा इतर शेतीमालाचा दर अंशत: वाढविते. या प्रक्रियेत अनेक हंगामांचा कालावधी लोटलेला असतो.परंतु याच्या उलट परिस्थिती शेतीमालाचे दर कमी करण्याबाबत दिसून येत आहे. शेतीमालाचा दर कमी करण्यासाठी समिती लागत नाही. कोणताही शासनआदेश लागत नाही किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीची शिफारस लागत नाही. फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यायचा व दर अंतिम जाहीर करावयाचा. इतकी दयनीय व जुलमी अवस्था शेतकऱ्यांबाबत होत आहे. या देशात शेती करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरीही शेतकऱ्यांची लुबाडणूक प्रत्येक घटकाकडून होत आहे. औषध दुकानदारापासून ते शेतीमाल खरेदी करणाऱ्यापर्यंत सर्वच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. बाजार समित्या नावापुरत्याच आहेत.यंत्रामध्ये गोलमालव्यापारी मॉईश्चर यंत्रामध्ये गोलमाल करतात व सोयाबीनचा दर पाडतात. हे यंत्र अधिकृत मान्यता असणारे नाही. कुणीही आणि कसेही बनविलेले ते यंत्र आहे. सेकंदात बदल करता येतो. सेकंदात शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असतानाही याविरोधात आवाज उठविला जात नाही.व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असताना शासन, लोकप्रतिनिधी गप्प असल्याबद्दल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया.सोयाबीन सौद्याच्यावेळी दर तीन हजार ८00 रुपये निघाला. हा दर फक्त सुरुवातीच्या पूजन झालेल्या ५ पोत्यांसाठीच होता. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात हा दर तीन हजार ५00 रुपयांवर आला. लगेच दोनच दिवसात हा दर तीन हजार ३00 रुपयांवर आला. आता तर तो दर तीन हजार रुपयांवर स्थिरावला आहे. सोयाबीनचा दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्च तरी पडेल का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे
सोयाबीनचा दर चार दिवसात आठशेने उतरला
By admin | Updated: October 16, 2014 22:49 IST