अशोक पाटील -इस्लामपूर -- आगामी विधानसभा निवडणुकीत ‘एकमेका सहाय्य करू’ असा संदेश देत माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि नानासाहेब महाडिक पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे वृत्त आहे. लवकरच खासदार राजू शेट्टी, नाईक, महाडिक एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात मोट बांधणार आहेत.इस्लामपूर मतदार संघात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना तगडे आव्हान देण्यासाठी महायुतीतून चाचपणी सुरू आहे. साम, दाम, दंडाची भाषा करणाराच जयंत पाटील यांच्याविरोधात लढू शकतो, याची पुरेपूर कल्पना असल्याने महायुतीतून महाडिक यांना उमेदवारी देण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यातून शिराळा आणि इस्लामपुरात एकमेकांना साथ देण्याची भूमिका नाईक आणि महाडिक गटाने घेतल्याचे समजते. लवकरच या दोघांत एकमत होणार असल्याचे कार्यकर्ते सांगतात.शिराळा मतदारसंघात समावेश असलेल्या वाळवा तालुक्यातील ५९ गावांत राष्ट्रवादीच्या विरोधात नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, अभिजित पाटील आणि भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. जि. प. निवडणुकीत महाडिक यांनी पत्नी मीनाक्षीताई महाडिक आणि पुत्र सम्राट महाडिक यांना विकास आघाडीतून उभे करून दोन्ही जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला होता, तर सी. बी. पाटील यांचे चिरंजीव जयराज पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता.गत विधानसभा निवडणुकीत मात्र महाडिक आणि सी. बी. पाटील यांनी शिराळ्यात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांना फटका बसला होता. त्यातून नाईक आणि महाडिक गटात दरी पडली होती. दोघांनी राजकीय गणिते मांडत एकत्र येण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.राज्य पातळीवर महायुतीची बैठक होऊन घटकपक्षांना जागा निश्चित होणार आहेत. शिराळा मतदारसंघ ज्या पक्षाला जाईल, त्यावर माझा प्रवेश निश्चित होईल. वाळवा तालुक्यातील ५९ गावांतून मदतीचा हात पुढे आल्यास त्यांचेही स्वागत करू.- शिवाजीराव नाईक, माजी मंत्री.इस्लामपूर मतदार संघात महायुतीतून लढण्याची आपली तयारी आहे. त्यासाठी मतदार संघात तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच आहे. शिराळा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला आमची सहकार्याची भूमिका राहील.- नानासाहेब महाडिक.
शिवाजीराव नाईक-महाडिकांचे मनोमीलन!
By admin | Updated: August 9, 2014 00:26 IST