सभापती आवटी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली स्थायी समितीची सभा झाली. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रात दरवर्षी डांबरी रस्ते केले जातात. डांबरी रस्त्यासोबतच काँक्रीट रस्ते करण्यावर भर देणार आहोत. रस्ते खराब होऊ नयेत, यासाठी दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी किंवा जाळीचे चेंबर करावेत, अशी सूचना प्रशासनाला दिली आहे. शहरात काळीखण, गणेश तलाव सुशोभीकरण सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी बोटिंग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांसाठी सायन्स पार्क उभारण्याचा विचार आहे. सांगली मिरजेतील ऐतिहासिक गोष्टींचे संग्रहालय करणार आहोत. मुलांना विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी महापालिका शाळांमध्ये सायन्स लॅब करण्याचाही प्रयत्न करण्यात येईल.
शहराच्या विकासासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांच्या सहकार्याने आयलँड, चौक सुशोभीकरण करण्यात येत आहेत. सेवा सदन हॉस्पिटलच्या वतीने एक बाग विकसित करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने मिरजेतील गाडवे चौक हा महाबळ उद्योग समूहाकडून विकसित करण्यात येणार आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना सोबत घेऊन विकासकामे करावेत, केवळ कागदोपत्री कामे करू नयेत, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी सदस्यांनी नूतन सभापती निरंजन आवटी यांचा सत्कार केला.
चौकट
कुपवाड ड्रेनेज, घनकचरा प्रकल्प मार्गी लावणार
सभापती आवटी म्हणाले, कुपवाड ड्रेनेज योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत हे मोठे प्रकल्प प्रलंबित आहेत. ते मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.