या बैठकीस नगराध्यक्षा शुभांगी बननेनावर, सुजय शिंदे, युवराज निकम, सलिम पाच्छापुरे उपस्थित होते. बिराजदार म्हणाले, माजी आमदार जगताप यांनी ओबीसी आंदोलनवेळी आंदोलनावर न बोलता आ. सावंत यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. अजूनही त्यांना पराभव पचविता आला नाही. त्यांनी विद्यमान आमदारांवर निष्कारण बोलणे चुकीचे आहे. आ. सावंत यांनी सत्तेवर नसताना देखील तीनवेळा पाणी परिषद घेऊन महाराष्ट्र व कर्नाटकातील मंत्र्यांबरोबर चर्चा करून तुबची-बबलेश्वर योजनेसाठी प्रयत्न केले आहेत. या योजनेद्वारे कर्नाटकातून पाणी मिळणे सत्यात उतरत आहे. या पाण्याचे श्रेय आ. विक्रम सावंत यांना जाऊ नये, यासाठी जगताप हे आरोप करत आहेत.
जगताप यांनी त्यावेळी या योजनेची टर उडविली होती. कर्नाटकचे माजी मंत्री एम. बी. पाटील यांना दोन पावसाळ्यांत कर्नाटकमधून पूर्वभागाला पाणी मिळाले आहे. याची शासनदरबारी नोंद आहे. उमदी येथील बाजार समितीच्या जागा खरेदीत कोणताही भ्रष्टाचार झाला नसून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. जगताप यांनी चांगल्या विकासकामांत खोडा घालू नये, असा सल्लाही बिराजदार यांनी दिला आहे.