सांगली : येथील हरिपूर रस्त्यावरील दीपक गायकवाड यांचा बंगला फोडून चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने लंपास केले. गायकवाड हे सांगली पोलीस दलात बॉम्बशोधक पथकात नियुक्तीस आहेत. याबाबत आज रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नातेवाईकाचे लग्न असल्याने गायकवाड दोन दिवसांपूर्वी कुटुंबासह मुंबईला गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळ्यांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या दागिन्यांची किंमत दीड लाख रुपये आहे. काल, बुधवारी दुपारी शेजाऱ्यांना गायकवाड यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. शेजाऱ्यांनी गायकवाड यांना संपर्क साधून माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गायकवाड कुटुंब घरी नसल्याने चोरीला काय गेले आहे याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. आज (गुरुवार) गायकवाड कुटुंब मुंबईहून परतले. त्यावेळी त्यांना पाच तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)
सांगलीत पोलिसाचा बंगला फोडला
By admin | Updated: July 4, 2014 00:47 IST