लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नाशिक येथील उद्योजकांवर स्थानिक गुंडांनी हल्ला करून मारहाण केली. या घटनेचा भाजप उद्योग आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी उद्योजकांवर गावगुंड व अन्य प्रवृत्तीच्या कडून हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद येथे भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीत घुसून मारहाण करण्यात आली, तर गणेश कोटिंगच्या व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून मारहाण झाली. कोरोनामुळे उद्योगधंदे अडचणीत आहेत. अशा काळात उद्योजकांना मारहाणीच्या घटना होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. या लोकांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक संजय आराणके, भाजप शहर जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष शरद नलावडे, सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय खांबे, कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रिज अँड कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे, विशाल गायकवाड, अक्षय जोशी, आनंदा जोशी, योगेश राजहंस, गणेश निकम उपस्थित होते.