ओळ : इस्लामपूर येथे प्रा. संदीप पाटील यांचा सत्कार डॉ. अरुण पाटील, अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी डी. जी. चव्हाण, माधुरी पाटील, स्मिता पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा. संदीप भास्कर पाटील यांनी रस्त्यात सापडलेली ६४ हजार रुपयांची रोख रकमेची बॅग संबंधितांना पोहोच केली. या प्रामाणिकपणाबद्दल प्राचार्य डॉ. अरुण पाटील आणि अनिल पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पाटील यांचा हा प्रामाणिकपणा माणुसकीची साक्ष देणारा ठरला.
बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान प्रा. संदीप पाटील कामानिमित्त दुचाकीवरून तांबवेहून कासेगाव-नेर्ले मार्गे पेठ येथे जात होते. नेर्ले परिसरात महामार्गाच्या कडेला दुचाकीच्या उजेडात त्यांना बॅग पडलेली दिसली. आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांनी ती ताब्यात घेतली. घरी आल्यावर बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये ६४ हजार ५० रुपयांची रोकड आणि काही कागदपत्रे असल्याचे लक्षात आले.
त्यांनी मुंबई पोलीस दलात मुलुंड येथे उपनिरीक्षक असणाऱ्या पत्नी सविता पाटील यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. कागदपत्रावरील मोबाईल नंबरही दिला. सविता पाटील यांनी संबंधित मोबाईलवर संपर्क केला असता ही बॅग कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तपेढीत काम करणाऱ्या नाटोली (ता. शिराळा) येथील दीपक दीनानाथ सहुते यांची असल्याचे स्पष्ट झाले. सहुते यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे.
उत्तरकार्यविधीच्या खर्चासाठी ही रक्कम घेऊन ते गावी निघाले होते. रस्त्यात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अंधारात दुचाकीला अडकवलेली बॅग रस्त्याकडेला पडल्याचे सहुते यांच्या लक्षात आले नाही. पत्नी सविता यांच्या सूचनेनुसार संदीप पाटील यांनी दुसऱ्या दिवशी ती बॅग कासेगाव पोलीस ठाण्यामध्ये जमा केली. पोलिसांनी ओळख पटवून ती सहुते यांच्या ताब्यात दिली.
प्राचार्य डॉ. अरुण पाटील आणि अनिल पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डी. जी. चव्हाण, प्रा. माधुरी पाटील, प्रा. मंगल मोरे, प्रा. शरद पाटील प्रा. जे. पी. मुल्ला, प्रा. स्मिता पाटील, प्रा. तृप्ती थोरात, प्रबंधक एस. जे. कदम, पी. बी. नलवडे, व्ही. एल. पाटील उपस्थित होते.