सांगली : जिल्हा परिषदेचे मूळ अंदाजपत्रक ३२ कोटी ८६ लाख ८३ हजार ७७९ रुपयांचे होते. शासनाकडील थकित निधी मिळाल्यामुळे सुधारित अंदाजपत्रक ८० कोटी ६२ लाख २४ हजार १९० रुपयांचे झाल्याचे उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत बुधवारी जाहीर केले. २२ कोटी २४ लाख ५१ हजार ९५६ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक असल्यामुळे सदस्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रत्येक सदस्यांनी विकास कामासाठी दहा लाख तर समिती सभापतींना बारा लाख, अध्यक्ष, उपाध्यक्षांना पंधरा लाख तर पंचायत समिती सदस्यांना प्रत्येकी पाच लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला.मूळ अंदाजपत्रकात जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून येणेबाकीपैकी १९ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. साहजिकच प्रथम सुधारित अंदाजपत्रकात ही उणीव भरुन काढण्यात येणार असल्याचे संकेत अर्थ समिती सभापती आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बसवराज पाटील यांनी सुधारित अंदाजपत्रकात सर्वच विभागांना भरघोस निधी देऊन खूश केले. सुधारित अंदाजपत्रक ८० कोटी ६२ लाख २४ हजार १९० रुपयांचे जाहीर केले. सर्व विभागांना खूश करून त्यांनी २२ कोटी २४ लाख ५१ हजार ९५६ रुपयांचे स्वीय निधीत शिल्लक ठेवले आहेत. या निधीतून जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येक दहा लाख, समिती सभापतींना बारा लाख, अध्यक्ष, उपाध्यक्षांना पंधरा लाख आणि पंचायत समिती सभापतींना पाच लाख विकास कामासाठी दिल्याचे पाटील यांनी जाहिर केले.सभेस सभापती दत्ताजीराव पाटील, किसन जानकर, राजेंद्र माळी, वैशाली नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचे सुधारित अंदाजपत्रक ८० कोटींचे
By admin | Updated: July 31, 2014 00:05 IST