प्रवीण जगताप -लिंगनूर मिरज पूर्वभागात द्राक्षपट्टा मोठ्या प्रमाणावर तयार झाला आहे. अवकाळी पाऊस व रोगांपुढे गुडघे न टेकता येथील द्राक्षोत्पादक वाटचाल करीत आहेत. द्राक्षे काढणीनंतर काहीशी विश्रांती घेत आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून एप्रिलअखेर ९० टक्के द्राक्षबागांच्या खरडछाटण्या पूर्णत्वास आल्या आहेत. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस द्राक्षबागांसाठी उपयुक्त असला तरी, अवकाळी गारपीट मात्र द्राक्षांच्या काड्यांकरिता धोकादायक ठरत आहे.मिरज पूर्वभागात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डिसेंबरपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला. सर्व टप्प्यात द्राक्षाची फळ छाटणी घेणारे द्राक्षोत्पादक या भागात असल्याने डिसेंबर ते मार्चपर्यंत येथील द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असतो. काही द्राक्षबागा बेदाणा निर्मितीच्या असल्याने या द्राक्षबागांची काढणी फेब्रुवारी व मार्चमध्ये सुरू असते. ज्या द्राक्षबागांची फळछाटणी आगाप असते, त्या द्राक्षोत्पादकांना मात्र जवळपास अडीच ते तीन महिने द्राक्ष काढणीनंतर कामांतून विश्रांती मिळते. मात्र बेदाण्याच्या द्राक्षोत्पादकांना वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर लगेचच खरड छाटणीच्या कामाला लागावे लागले आहे.खरड छाटणीनंतर आता द्राक्षबागांतून पालवी फुटावयास प्रारंभ झाला आहे. कालावधीनुसार पालवी फुटण्याचे प्रमाण कमी-जास्त दिसून येत आहे. त्याचबरोबर आता सबकीन शेंडा मारणे व विरळणी या कामासही काही ठिकाणी वेग आलेला दिसून येत आहे. खरड छाटणी द्राक्षबागांच्या गर्भधारणेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या काडीला पक्व बनविण्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. काडी चांगली पक्व बनल्यास काडीला तीन ते चार घड पडू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक खरड छाटणी व अन्य आंतरमशागतीच्या कामास वेग आला आहे. पाऊस चालेल, पण गारा नकोतउन्हाळ्यात अवकाळी पाऊस द्राक्षबागांसाठी उपयुक्त असला तरी, अवकाळी गारपीट मात्र द्राक्षांच्या काड्यांकरिता धोकादायक ठरत आहे. खरड छाटणीनंतर पालवी फुटताना द्राक्षबागांना मुबलक पाणी लागते. मात्र नेमके याच महिन्यात पाण्याची टंचाई तयार होते. पण आता भागात ‘म्हैसाळ’चे पाणी कालव्यांतून फिरू लागले आहे. या पालवी फुटण्याच्या मोसमात अवकाळी पाऊस पडला, तर तो द्राक्षबागांना उपयुक्तच आहे. मात्र याच अवकाळी पावसाचे गारांत रूपांतर झाल्यास काडी फुटणे, काडीला मार बसणे, पाने फाटणे यामुळे काडी पक्व होण्यात व त्यांना घड पडण्यात अडथळे येतात. जास्त गारपिटीमुळे पुन्हा तळातून काडी कट करून नव्याने काडी तयार करण्याचा त्रास व खर्च पेलावा लागतो.
‘म्हैसाळ’च्या पाण्याने द्राक्षबागा वाचल्या
By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST