इस्लामपूर : इस्लामपूर येथे भावजयीवर बलात्कार करणाऱ्या नराधम दिराला दोषी धरून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील दुसरे जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी सात वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याचवेळी न्यायालयाने पीडित महिलेस नुकसानभरपाई म्हणून दंड रकमेतील २0 हजार रुपये देण्याचे निर्देशही दिले. दंडाची रक्कम न दिल्यास आरोपीने १५ दिवसांची साधी कैद भोगावयाची आहे. नितीन शामराव पाटील (वय ३८, रा. इस्लामपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील दिलीप विष्णुपंत शिंदे (बोरगाव) यांनी काम पाहिले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मृत भावाचे वर्षश्राध्द असल्याचे सांगण्यास आलेल्या आरोपी नितीन पाटीलने १३ आॅगस्ट २0१३ रोजी दुपारी चारच्या सुमारास २५ वर्षीय भावजयीवर तिला व तिच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला होता. घटनेवेळी पीडित महिला घरी एकटीच होती. त्यावेळी नितीनने तिला पाणी मागितले. पाणी आणण्यास ती आत गेल्यावर त्याने दरवाजा बंद करून बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने इस्लामपूर पोलिसांत त्याच्याविरुध्द फिर्याद दिली. नितीन पाटील याच्या कृत्यामुळे नातेवाईकांसह गावात संतापाची लाट उसळली होती. न्या. श्रीमती के. एस. होरे यांच्यासमोर झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. त्यापैकी फिर्यादी महिला, तिची आई व वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. (वार्ताहर)
बलात्कारी दिरास सश्रम कारावास
By admin | Updated: April 25, 2015 00:07 IST