बरकतों का महिना है ये, इसमें नाज़ील हुवा कुरआन ॥
गुनाहों से बख्शीश का वसीला है ये, माहे सियाम ।
गुनाहों से तौबा का वसीला है ये, और इस्लाम की है शान ॥
फरिश्ते उतरते हैं जमीन पर, ले कर नियामतें तमाम ।
बख्शीश का वसीला हे ये, माहे रमजान ॥
ईद-उल-फितर म्हणजे भूक-तहान सहन करून महिनाभर देवाची आठवण करत उपवास करणाऱ्यांना मिळालेली देणगी. मुस्लिम समाजातील सर्वांत मोठा असणारा हा रमजान सण प्रेम, बंधुता व समानता शिकवतो. गोड सण म्हणून ओळखला जाणारा रमजान भारतीय समाजासाठी प्रेम व बंधुत्वाचा संदेश देतो.
हा सण इस्लाम धर्मातील परंपरेचे प्रतिबिंब आहे. रोजेदारासाठी रमजानचेे महत्त्व त्याच्या अल्लाहबद्दलच्या कृतज्ञतेवरून काढले जाऊ शकते. चंद्राची कोर पाहून ईद साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आजच्या हायटेक युगातसुद्धा कायम आहे. मोकळेपणाने बोलायचे झाल्यास, संपूर्ण रमजान महिना व नंतरची ईद ही माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते व त्याला समाजाप्रती असणाऱ्या त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन त्या पार पाडण्यास शिकवते.
रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे. या महिन्याला मुस्लिम धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये सूर्योदय ते सूर्यास्त कडक उपवास (रोजा) केला जातो. शिवाय संपूर्ण महिना अल्लाहची इबादत केली जाते. यामध्ये कुराण पठण, रात्री वीस रकात अतिरिक्त तराबीची नमाज अदा केली जाते.
रमजान म्हणजेच बरकतीचा महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम समाजातील लोक आपल्या एकूण उत्पन्नाच्या २.५ टक्के रक्कम बाजूला काढतात. याला जकात असे म्हणतात शिवाय माणसी १ किलो ६३३ ग्रॅम गहू किंवा त्याच्या दराबरोबरीची रक्कम गोरगरिबांमध्ये वितरित करावी लागते, याला फितरा म्हणतात. आर्थिक स्थिती चांगली असणारा प्रत्येकजण फितरा देतोच. लहान मुलांवर जो फितरा निघतो, तो त्यांच्या पालकांनी काढून वाटप करावा लागतो. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या गोरगरीब लोकांमध्ये रोख रक्कम व आपण ज्या गुणवत्तेचे धान्य व कपडे वापरतो, त्याच गुणवत्तेचे धान्य व कपडे वाटप केले जातात. त्यामुळेच या सणाला ईद-उल-फितर असेसुद्धा संबोेधले जाते. इस्लाममध्ये असे मानतात की, नवीन कपडे घालून स्वत:च्या आनंदात मिरवणाऱ्यांची ही ईद नाही, तर ही ईद त्याची आहे, ज्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या गोरगरिबांना आपल्या आनंदात सामावून घेतले आहे.
इस्लामच्या शिकवणीनुसार मनामनांतील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेह वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या मनात रुजविणारा महिना आहे. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणाऱ्या या महिन्याचे महत्त्व व पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच आहे.
या महिन्यामध्ये महिनाभर अल्लाहची इबादत करणाऱ्याला अल्ला त्याची इच्छा पूर्ण करतात असे मानने जातेे. रमजान म्हणजेच भरभराट (बरकत) व या भरभराटीची (बरकत) मुक्तपणे उधळण करणाऱ्या महिन्याची सुरवात चंद्रदर्शनाने होते व रमजानच्या चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकजण आनंदी होतो. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळची नियमित नमाज, कुराण पठण आणि अल्लाहचे स्मरण, चिंतन करायचे असते. या तीस दिवसांत उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे.
या महिन्यातच अल्लाहचे प्रेषित हजरत महंमद पैगंबर सलल्ला अलैही सल्लम यांना कुराणाचा साक्षात्कार झाला. त्यांच्या अखंड साधनेचे व खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. यावेळी महंमद पैगंबर सलल्ला अलैही सल्लम यांनी जगाच्या कल्याणासाठी अल्लाहजवळ प्रार्थना केली. ईश्वराच्या प्रसन्नतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे आगळेवेगळे स्थान अबाधित आहे. माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट, पाप-पुण्याची जाणीव करून देण्यासाठी व भुुकेने व्याकुळ लोकांची जाणीव राहावी यासाठी या महिन्यात उपवास करायचे असतात. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचार-विचारांचे शुद्धिकरण होय.
अनीती, अनाचार, अत्याचार, अवास्तव या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनियेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य साठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक आहे.
या ईदच्यावेळी शिरखुर्मा केला जातो. महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजेदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच. जो एकमेकांच्या शुभेच्छांनी, सदिच्छांनी साजरा करायचा असतो.
- सलीम वठारे, बागणी