सांगली : महापालिकेकडून सांगलीकरांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन प्रत्येकवेळी दिले जाते. शुद्धीकरण यंत्रणेवर आता कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू आहे. पण यंदाच्या पावसाळ्यात सांगलीकरांच्या नशिबी अशुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरूस्तीचे काम अपूर्ण आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात त्यातील एकही काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने दुरुस्तीच्या नावाखाली कामाचा खेळखंडोबा केला आहे. महापालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा होतो. १९८६ पासून माळबंगला येथे ३६ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे शुद्धीकरण प्लँट आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. ३६ एमएलडीवरून ५६ एमएलडी क्षमता केली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली तीस वर्षे पाण्याची गढुळता कमी करण्यासाठी फक्त तुरटीचाच वापर होत होता. पावसाळ्यात तुरटी व पीएसी पावडरचा वापर करून गढुळता कमी केली जाते. यंदा मात्र पावसाळ्यात नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. कारण जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असून दोन वर्षात एकही काम पूर्ण झालेले नाही. माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तेथील त्रुटींवर बोट ठेवले आहे. ५६ एमएलडी शुद्धीकरण यंत्रणेतील इरिगेशन फौंटनचे काम अर्धवट आहे. प्लॅश मिक्शर पूर्वी होता तो आता अस्तित्वातच नाही. दोन्ही क्लॉरिफायमध्ये गाळ साचलेला असून एक क्लॉरिफाय स्लॅबचे पत्रे, लाकडी साहित्य व लोखंडी सळयांनी भरलेला आहे. दोन्ही क्लॉरिफायमध्ये ब्रीज चालू नाही. ड्रेन हॉलचे बांधकाम व्यवस्थित चालू नाही. एक ड्रेन हॉल बंद आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील चार फिल्टर बेडपैकी एक बेड दुरुस्तीसाठी वर्षभर बंद आहे. त्यामुळे जादा झालेले पाणी बायपासने सोडावे लागते. क्लोरीनसाठी खोली बांधून तयार आहे, पण या खोलीत ठेकेदाराने इतर साहित्य भरून ठेवले आहे. त्यामुळे क्लोरीनची पोती उघड्यावर टाकण्यात आली आहेत. सध्या नादुरुस्त प्लँटमधून क्लोरीन वापरले जात आहे. त्याकडेही कोणाचे लक्ष नाही. एकूणच जलशुद्धीकरण केंद्राचे आरोग्य बिघडल्याने पावसाळ्यात नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची चिंता आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचा उठाव : कार्यकारी अभियंत्यांना पत्रमाळ बंगला जलशुद्धीकरण केंद्राकडील १३ कर्मचाऱ्यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना पत्र पाठवून तेथील त्रुटींवर बोट ठेवले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. इरिगेशन, फौंटन व ब्रीजवर विद्युत व्यवस्था नाही. वॉश वॉटर टाकी व क्लोरीन खोलीतील दिवे बंद आहेत. अशा स्थितीत कामगार जीव मुठीत धरून रात्रंदिवस काम करीत आहेत. शुद्धीकरण प्रक्रियेतील यंत्रणाच सुरू नसल्याने पावसाळ्यात शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.दहा वर्षे बेडची वाळूच बदललेली नाही जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमधील बेडची वाळू गेली दहा वर्षे बदलण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी पाण्याला दुर्गंधी सुटली होती. त्यावरून पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरण्यात आले होते. त्यानंतर गुजरातहून वाळू मागविण्यात आली. पण वर्षभर ही वाळू आवारातच पडून आहे.
पावसाळ्यात सांगलीकरांना अशुद्ध पाणी
By admin | Updated: May 12, 2016 00:17 IST