सांगली : सांगली शहरासह मिरज तालुक्यात आज (मंगळवार) पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. सांगलीतील मारुती चौक, जुन्या स्टेशन रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिले होते. दुपारपर्यंत हे पाणी तसेच होते. महापालिका परिसरातही दलदलीमुळे गैरसोय झाली. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील निर्यात द्राक्षबागायतदार चिंतेत सापडला आहे.सकाळी चार तासात मिरज तालुक्यात २४ मिलिमीटर पाऊस झाला. सांगली शहरात पहाटे दोनपासून पावसाने सुरुवात केली होती. मुसळधार पावसामुळे मारुती चौक, शिवाजी मंडई, स्टेशन रस्त्यावर, गुंठेवारी भागात पाणी साचून राहिले होते. गटारी तुंबल्यामुळे स्टेशन रस्त्यावर दुपारपर्यंत पाणी तसेच राहिल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली. पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधानाचे वातावरण आहे. परंतु, महिनाभर पावसाने उघडीपच न दिल्यामुळे मिरज, वाळवा, पलूस तालुक्यातील सखल भागातील शेतीत पाणी साचून राहिले आहे. त्यातच मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे प्रमाण जास्त आहे. या भागामध्ये पडलेल्या पावसामुळे आॅगस्ट महिन्यात छाटणी झालेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. आठवडाभरात दोन दिवस पाऊस, तर दोन दिवस ढगाळ हवामान आहे. हे वातावरण आणि पावसामुळे द्राक्षबागांमध्ये दावण्या, करपा, थ्रीप्स अशा रोगांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे येथील द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला गुंठेवारीचा अनुभवमहापालिका क्षेत्रात तब्बल ४0 हजार घरे गुंठेवारीत असून लाखो लोकांना गुंठेवारीचा वनवास भोगावा लागतो. गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारीतील लोक सुविधांपासून वंचितच आहेत. नियमितीकरणासाठी पैसे भरूनही त्यांच्या वाट्याचे दुखणे कमी झालेले नाही. गुंठेवारी नागरिकांनी कितीही ओरड केली तरी ती महापालिकेच्या मुख्यालयात कधी पोहोचत नाही. त्यामुळे गुंठेवारीतील सुविधांचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. महापालिकेच्या मुख्यालय आवारात सध्या सुशोभिकरणासाठी खुदाई केली आहे. संपूर्ण आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवायचे असल्याने ही खुदाई केली होती. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने याठिकाणी घोट्यापर्यंत चिखल साचला. ड्युटीवर आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवारातील ही दलदल पाहून धक्का बसला. वाहनेही आत जात नव्हती. काहींनी दूर वाहने लावून चिखलातून मार्ग काढतच कार्यालय गाठले.
सांगली शहरासह मिरज तालुक्यात पावसाने सांगलीकरांची दैना
By admin | Updated: September 23, 2014 23:59 IST