सांगली : शासनाने उपचारांसाठी निश्चित केलेल्या दरपत्रकाला धाब्यावर बसवत २३ खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून तब्बल २८ लाख रुपये जादा वसूल केले आहेत. हे पैसे परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १०९ नोटिसा काढल्या आहेत. दरम्यान, दुसऱ्या लाटेतील उपचारांचा खर्च ५७ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
कोविड रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने बिलांची आकारणी होऊ लागल्याच्या तक्रारी पहिल्या लाटेपासूनच सुरू होत्या. त्याची दखल घेत शासनाने दरपत्रक जाहीर केले. प्रत्येक उपचारासाठी दर निश्चिती केली; पण या रुग्णालयांनी दरपत्रक धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट झाले आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झाली. त्यानंतर २५ जूनअखेर रुग्णालयांनी २७ लाख ९२ हजार १६१ रुपये जादा घेतल्याचे लेखापरीक्षणात आढळले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांना तातडीने नोटिसा जारी केल्या. पैसे परत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रुग्णालयांनी १३ लाख ३८ हजार ९०१ रुपये परत केले; पण अद्याप १४ लाख ५३ हजार २६० रुपये परत केलेले नाहीत.
पैसे परत मिळाल्याने १३४ रुग्णांना दिलासा मिळाला, अजूनही २४१ रुग्ण पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. रुग्णालयांनी त्यांना दाद दिलेली नाही. रुग्णालयांची ही दादागिरी व मनमानी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली आहे.
चौकट -
रुग्णालयांचे एमआरपीवर बोट
शासनाने वैद्यकीय उपचारांसाठी दर ठरवून दिले आहेत; पण काही रुग्णालये अैाषधे व साधनसुविधांची बिले एमआरपीनुसार लावत आहेत. अैाषधांच्या प्रत्यक्ष किमती एमआरपीपेक्षा बऱ्याच कमी असतात; पण रुग्णालये सवलत न देता पूर्ण रक्कम आकारून लाखोंचा मलिदा मिळवीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट -
मिरज, विट्यातील रुग्णालयांत मनमानी
मिरजेतील दोन रुग्णालयांनी वाट्टेल तशी बिल आकारणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरजेतील एका रुग्णालयाने ३ लाख २३ हजार ४५० रुपये जादा घेतले आहेत. दुसऱ्याने तब्बल ८ लाख ७५ हजार ५०० रुपये जादा वसूल केले आहेत. विट्यातील रुग्णालयाने ११ लाख १४ हजार ८११ रुपये जादा आकारले आहेत, तर खरसुंडीतील रुग्णालयाने १ लाख १५ हजार ५०० रुपये अतिरिक्त घेतले आहेत.
चौकट -
दुसऱ्या लाटेत ५७ कोटी रुपयांचा खर्च
१ एप्रिलपासून खासगी रुग्णालयातील रुग्ण ११ हजार २६३
उपचारांसाठी झालेला खर्च ५६ कोटी ७५ लाख ८६ हजार ५४४ रुपये
प्रत्येक रुग्णाचा सरासरी खर्च ५० हजार ३९४
जादा आकारणी झालेल्या बिलांची संख्या ३७१
जादा वसूल केलेलेे पैसे २७ लाख ९२ हजार १६१ रुपये