सांगली : नोटाबंदीनंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी आयकर विभागाकडून केल्यानंतर, आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला. ईडीकडून दिवसभर तपासणी सुरू होती. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोटाबंदीनंतर नाबार्डनेही तपासणी केली होती. प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, सावळज, कडेगाव, विटा, मिरज मार्केट यार्ड, सांगली मार्केट यार्डसह १६ शाखांची तपासणी केली होती. याशिवाय अन्य तालुकास्तरीय शाखांचीही तपासणी करण्यात आली होती. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या एकूण १९ शाखा ांशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. नाबार्डच्या पथकाने याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. दोन टप्प्यात ही तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल आयकर विभागालाही दिला होता. ज्या खातेदारांनी १ लाखाहून अधिक रकमेचा भरणा खात्यात केला आहे, अशा सर्व खातेदारांची यादी वित्तीय आसूचना एकक (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) नेही मागविली आहे. २0 डिसेंबर रोजी याबाबतची यादी जिल्हा बँकेने संबंधित खात्याकडे पाठवून दिली. अशा सर्व स्तरावर तपासण्या झाल्यानंतर आयकर विभागाने छापा टाकला होता. आयकर विभागाचे पथक पंधरा दिवसांपूर्वीच तपासणी करून परतले आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असतानाच, अंमलबजावणी संचालनालयाने बँकेवर छापा टाकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बँकेतील कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे समजते. या छाप्याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. नाबार्ड, आयकर विभाग आणि आता ईडीने छापा टाकल्याने बँकेत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेवर ‘ईडी’चा छापा
By admin | Updated: January 6, 2017 23:51 IST