सांगली : महिलांना अनोळखी मोबाईलवरून जे अश्लील संदेश येतात, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांची पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांनी यासंदर्भात तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही सावंत यांनी केले आहे.ते म्हणाले की, अनेकदा महिलांना अनोळखी मोबाईलवरून अश्लील संदेश येतात. तसेच काहीजण थेट संपर्क साधून अश्लील भाष्य करतात. प्रतिष्ठेला घाबरून महिला याबाबत तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. काही महिलांना प्रथम अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी येतो. हा नंबर कुणाचा आहे?, मोबाईल कुठे लागला आहे? अशी चौकशी केली जाते. महिलेचा आवाज आला, तर संबंधित व्यक्ती त्या महिलेस सातत्याने संपर्क साधून त्रास देते. महिला प्रत्यक्षात तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. तक्रार आली, तर ती पोलीस ठाण्यात येते. ठाण्याकडून त्या व्यक्तीचा शोध घेण्यास विलंब लागतो.मोबाईलवरून येणारे अश्लील संदेश, धमक्या याचा जलदगतीने तपास होण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. महिलांच्या तक्रारी आल्या, तर त्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी उपनिरीक्षक संतोष जाधव यांची नियुक्ती केली आहे. ज्या महिलांच्या तक्रारी प्रलंबित आहेत, त्यांचा आता तातडीने छडा लावला जाईल. महिलांनीही मोबाईलवर अनोखळी व्यक्तींकडून त्रास होत असेल, तर तक्रार देण्यासाठी पुढे यावे. (प्रतिनिधी)
महिलांना अश्लील संदेश; तपासासाठी स्वतंत्र पथक
By admin | Updated: December 24, 2014 00:22 IST