सांगली : पाणी आणि फळशेती यांचे सूत्रबध्द नियोजन करून उजाड माळ वृक्षाच्छादित करणे शक्य आहे. सांगलीतील आभाळमाया फौंडेशनच्या सहकार्याने हिवतड (ता. आटपाडी) येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यात दहा शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती पथदर्शी प्रकल्पाचे समन्वयक संपतराव पवार यांनी दिली.पवार म्हणाले की, महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या घटना घडण्यास निसर्ग कारणीभूत आहे, धोरण कारणीभूत आहे, की नियोजन कारणीभूत आहे, हे पडताळून पाहण्याची गरज आहे. दुष्काळी भागाचा प्रमुख आधार पशुधन आहे. प्रत्येक टंचाईच्या काळात चाराटंचाई तीव्र होते, हा अनुभव सतत येऊनही उपाययोजना करणारी एकही योजना शासनाकडे नाही. सोयाबीन, कापूस यासारखी पिके हाती लागली नाहीत, तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडतो. झाडे वाळली, तर खात्रीशीर फायदा देणारी फळशेती उद्ध्वस्त होते. शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडून पडते. त्यातून शेतकरी आत्महत्येकडे वळतो. या शेतकऱ्यांना योग्य मार्गावर नेण्यासाठी फळशेती आणि पाणी यांचे सूत्रबध्द नियोजन करण्याचे धोरण ठरविले आहे. यातूनच हिवतड येथील धनाजी मंडले, हणमंत मंडले, सुनीता मंडले, रघुनाथ मंडले, उमाजी मंडले, राजू पोळ, पोपट मंडले, सोपान मंडले, चंद्रकांत मंडले, दीपा मंडले या शेतकऱ्यांचा ‘जय मल्हार ग्रुप’ केला आहे. या शेतकऱ्यांच्या कोरडवाहू एक एकर क्षेत्रात डाळिंब लागवड केली जाणार आहे. डाळिंबाच्या प्रत्येक झाडास दरवर्षी पुरेसे म्हणजे ४०० लिटर पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बागेमध्ये शंभर टक्के सेंद्रीय खताचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक क्षेत्रास दोन हजार लिटर पाणीसाठा करण्यासाठी टाकी, होजपाईपद्वारे प्रत्येक झाडास पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक एकर डाळिंब बागेसाठी चाळीस हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचीही शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली असून २८ डिसेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. सांगलीतील आभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र व्होरा, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जयंत बर्वे, पर्यावरणतज्ज्ञ अजित तथा पापा पाटील आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे. (प्रतिनिधी)
माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलणार
By admin | Updated: December 23, 2014 23:50 IST