लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आठ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पावले उचलत पोलीस रस्त्यावर येताच गुरुवारी सांगली चिडीचूप झाली. अकारण फिरणाऱ्यांना चोप देतानाच वाहने जप्त करण्याची मोहीम पोलिसांनी राबविल्यामुळे शहरातील रस्ते, चौक सकाळपासूनच ओस पडले.
शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी काळातही लाेकांचा मुक्तसंचार दिसत होता. पोलिसांनीही फारशी कठोर भूमिका घेतली नव्हती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करून पोलिसांनाही कडक कारवाईच्या सूचना दिल्या. या लॉकडाऊनला बुधवारी रात्री सुरुवात झाली. त्यापूर्वीच दाेन दिवसांपासून जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी कठोर पावले उचलल्याने त्याचा परिणाम गुरुवारी दिसून आला.
अकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच पोलीस रस्त्यावर उतरले. शहराच्या प्रमुख नाक्यांवर व मार्गांवर बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. प्रत्येकाला बाहेर पडण्याचे कारण विचारले होते. कागदपत्रे पाहूनच शहरात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे सांगली शहर दिवसभर सामसूम होते.
माधनवनगर जकात नाका, कॉलेज काॅर्नर, स्टेशन चौक, स्टँड परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विश्रामबाग्, कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ, वसंतदादा कारखान्याच्या मागून मिरजेला जाणाऱ्या मार्गावर आदी ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तपासणी सुरू केली होती. या सर्व ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने अडविण्यात आली होती.
शहरातील हरभट रोड, गणपती पेठ, कापड पेठ, मारुती रोड, मारुती चौक, शिवाजी मंडई, पटेल चौक आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. शहरातील प्रमुख मार्गांवरही शांतता होती. त्यामुळे या वर्षी प्रथमच कडक लाॅकडाऊनचा अनुभव लोकांना आला.
चौकट
दुपारी नाकेही सामसूम
दुपारी २ वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने तपासणी नाक्यावरील पोलीस बंदोबस्तही कमी झाला, मात्र कारवाईच्या धास्तीने लोकांनी याचा गैरफायदा घेतला नाही. त्यामुळे दुपारनंतरही शहरातील लोकांचा वावर कमी होता.
चौकट
पोलिसांशी वाद
वाहने अडवून कारवाई करताना अनेक ठिकाणी पोलीस व नागरिकांत वाद सुरू होते. काहींनी जुने पास दाखविले, तर काहींनी सांगितलेली कारणे पोलिसांना योग्य वाटली नाहीत. अशा वेळी अनेकांनी पोलिसांशी वाद घातला.
चौकट
रुग्णालयात जाणाऱ्यांना दिली मुभा
रुग्णालयात, औषधांच्या दुकानात किंवा तपासणीसाठी जाणाऱ्यांना पोलिसांनी कागद पाहून सोडले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, औद्योगिक कामगारांनाही त्यांनी परवानगी दिली.