सांगली : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे. उद्या (बुधवार) सायंकाळी सात वाजताच पोलिसांचा रस्त्यावर पहारा सुरु राहणार आहे. नाकाबंदी सकाळपासूनच लावली जाणार आहे. हुल्लडबाज व तळीरामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिले आहेत. अपघाताला आळा बसण्यासाठी, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई सातत्याने केली जाते. बुधवारी सायंकाळनंतर ही मोहीम कडकपणे राबविण्याचे पोलिसांनी नियोजन केले आहे. यासाठी प्रत्येक चौकात बॅरिकेटस् लावून वाहने अडवून चालकांची तपासणी केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता नाकाबंदी लावली जाणार आहे. ती २४ तास असणार आहे. शस्त्रधारी पोलिसांचा पहारा तैनात केला आहे. तळीरामांची तातडीने वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यासाठी शासकीय रुग्णालयात जादा डॉक्टर नियुक्त करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. नशेत वाहन चालविल्याचे आढळून आल्यास त्याचे वाहन व लायसन्स जप्त केले जाणार आहे. तळीरामांवर कारवाई कशी करावी, याचे पोलिसांना आज, मंगळवार सकाळी प्रशिक्षण देण्यात आले. सांगली व मिरजेसह ग्रामीण भागातही ही कारवाई केली जाणार आहे. रात्रभर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. (प्रतिनिधी) जल्लोषाला विरोध नाही : सावंत पोलीसप्रमुख सावंत म्हणाले, थर्टी फर्स्टचा जल्लोष व नव्या वर्षाचे स्वागत करण्यास, तसेच दारु पिण्यास पोलिसांचा विरोध नाही. मात्र नशेत वाहन चालविणे गैर आहे. जल्लोष साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही. दुचाकीचा सायलेन्सर काढून दुचाकीवरून तिघे बसून गेल्याचे आढळून आल्यास दुचाकी जप्त करुन संबंधितावर कडक कारवाई केली जाईल.
जिल्ह्यात पहाटेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त
By admin | Updated: December 30, 2014 23:26 IST