सचिन लाड - सांगली --घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी नवा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. परगावी जाताना नागरिकांनी घरातील दागिने पोलीस ठाण्यात जमा करुन त्याची पोहोच घ्यावी. गावाहून परतल्यानंतर हा ऐवज त्यांना परत केला जाणार आहे. हा प्रयोग जिल्ह्यात प्रथमच विश्रामबाग पोलीस राबविणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी सांगितले.पोलीस घेणार दागिन्यांची जबाबदारीशहरात सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याविषयी पोलिसांनी अनेकदा आवाहन केले. मात्र या आवाहनास नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता परगावी जाणाऱ्या नागरिकांचे दागिने पोलीस ठाण्यातील ‘लॉकर’मध्ये जमा करुन घेण्याचा प्रयोग जिल्ह्यात प्रथमच विश्रामबाग पोलिसांकडून राबविला जाणार आहे. घरफोडी झाली तरी त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आहेत. आज-ना-उद्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस येतोच. गेल्या दोन वर्षात घरफोडीचे मोठ्याप्रमाणात गुन्हे उघडकीस आणून लोकांना चोरीस गेलेला ऐवज परत मिळवून दिला आहे. मात्र प्रत्येकाने उपाययोजना केल्यास व दक्षता घेतल्यास घरफोडीचे गुन्हेच होणार नाहीत. - दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख खबरदारी घेतल्यास टळू शकते घरफोडीरात्री झोपताना घराचा दरवाजा, खिडक्या, कंपाऊंडचे प्रवेशद्वार व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी.शेजाऱ्यांना आपल्याबाबत आवश्यक असणारी माहिती असू द्या. उदा. - दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाचा पत्ता, जवळच्या नातेवाईकांचा पत्ता. गावाला जाताना किंवा बाहेर जाताना घर व्यवस्थित बंद करा. तसेच आपण बाहेर जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्यावी.जास्त काळ बाहेरगावी जायचे असल्यास घरात जास्त पैसे, दागिने ठेवू नका. गावाला जात असल्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी. समक्ष येऊन माहिती देण्यास वेळ मिळाला नाही, तर दूरध्वनीवरून माहिती द्यावी.आता शहरातीलदुकानेही ‘टार्गेट’गेल्या काही दिवसात चोरट्यांनी व्यापाऱ्यांची दुकाने ‘टार्गेट’ केली आहेत. मार्केट यार्ड तसेच माधवनगर (ता. मिरज) येथे दुकान फोडीची मालिकाच सुरु आहे. विशेषत: विश्रामबाग ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दुकाने फोडण्याचे प्रकार घडत आहेत. ठाण्याची हद्द मोठी आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन गस्त घालणे शक्य होत नाही. यामुळे चोरट्यांची चांदी होत आहे. चोरीचे घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे निरीक्षक भांगे यांनी सांगितले. नोकरांबाबत काळजी घ्या...नोकराचे संपूर्ण नाव, वय, गाव, राहण्याचा संपूर्ण पत्ता, त्याचे छायाचित्र व संपर्क क्रमांक घेऊन ठेवा.नोकराचे मूळ राहण्याचे ठिकाण, तसेच त्याच्या कुटुंबियांची माहिती घ्या.नोकरास परिसरातील ओळखणाऱ्या दोघांची नावे, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घ्या.नोकराचा पासपोर्ट, छायाचित्र व शक्य झाल्यास त्याच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवा.नोकरासमोर आपल्या मालमत्तेचे प्रदर्शन टाळा. उदा. : नोकरासमोर घरातील मौल्यवान वस्तू तसेच पैसे हाताळू नका. कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्या.
दागिन्यांसाठी आता पोलिसांचे लॉकर!
By admin | Updated: November 9, 2014 23:33 IST