सदानंद औंधे - मिरज -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मिरजेतील नगरसेवकांचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरू आहे. नगरसेवकांना सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने, उमेदवारांनी ‘मिरज पॅटर्न’ची धास्ती घेतली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघाच्या तीन लाख लोकसंख्येपैकी १ लाख ३० हजार मतदार मिरज शहरात आहेत. शहरातील २४ नगरसेवकांपैकी २० काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. मिरजेत भाजपचा एकच नगरसेवक असताना, गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शहरात भाजपला मताधिक्य मिळाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवक कोणाच्या प्रचारात होते, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात दिसणाऱ्या नगरसेवकांचे समर्थक मतदानावेळी भाजपच्या तंबूत दिसल्याने, उमेदवारासह काँग्रेस नेतेही हैराण झाले होते. माजी महापौर किशोर जामदार, इद्रिस नायकवडी व सुरेश आवटी यांच्या गटात मिरजेतील सर्व नगरसेवक विभागले आहेत. महापालिकेतील राजकारणामुळे काँग्रेसच्या इद्रिस नायकवडी यांची पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारापासून फटकून असलेल्या नायकवडी यांच्या समर्थकांनी आम आदमी पार्टीचा झेंडा हाती घेतला होता. सुरेश आवटी यांचे भाजपसोबत सख्य आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद डावरे महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होते. मात्र डावरे आता काँँग्रेसऐवजी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मिरजेतील नगरसेवक कोणासोबत असणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार निवडीवर निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. मिरजेतील नगरसेवक सध्या काँग्रेसचे सी. आर. सांगलीकर यांच्यासोबत दिसत आहेत. मात्र इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान यांच्यासह काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या बाळासाहेब होनमोरे यांच्या बंडखोरीला पांिठंबा दर्शविला आहे. निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वीच ही स्थिती असली तरी, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नगरसेवकांना आपल्यासोबत टिकवून ठेवण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. नगरसेवक सोबत असल्यामुळे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत उमेदवार विजयी होतोच, हे मात्र अद्याप दिसून आलेले नाही. मात्र येथील नगरसेवक राजकीय उलथापालथ घडवून उमेदवारांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडत असतात. नगरसेवकांना प्रचारात सोबत घेतल्याने प्रभागातील नगरसेवकांचे विरोधक उमेदवाराच्या विरोधात जाण्याचा धोका असला तरीही, नगरसेवकांना नाईलाजाने सोबत घ्यावे लागते. मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मैत्रीचे गणित नेत्यांनाही समजलेले नाही. येथील नगरसेवकांची भूमिका सध्या तळ्यात-मळ्यात असून, काही नगरसेवक भाजप व काँग्रेस या दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या संपर्कात आहेत. मिरजेतील काँग्रेसच्या एका नगरसेवकाने ‘मातोश्री’वर उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली आहे. काही नगरसेवक स्वत:च्या पक्षाच्या धोरणाऐवजी कुंपणावर बसून फायद्याच्या उमेदवारांचा अंदाज घेत आहेत.जयंत पाटील यांनाही दणकाग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीत ‘मिरज पॅटर्न’चा चांगला फटका बसला. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी विरोधकांशी सोयीस्कर युती करून नेत्यांचा आदेश धाब्यावर बसवला. गत निवडणुकीत शिक्षणसम्राट अपक्षाला काही नगरसेवकांनी मोठा आर्थिक फटका दिला. सर्वाधिक खर्च करणाऱ्या या उमेदवारास पाच हजार मतेही मिळाली नाहीत. मात्र काही नगरसेवकांची चांदी झाली!
मिरजेत नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात
By admin | Updated: September 23, 2014 23:53 IST