गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील एक लाख रुग्णांपैकी मिरज तालुक्यातील विविध गावांतील दहा हजार रुग्ण व मिरज शहरातील नऊ हजार रुग्ण आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या मिरज तालुक्यात सर्वाधिक आहे. गतवर्षी नोव्हेंबरपासून कमी झालेली रुग्णांची संख्या एप्रिलपासून झपाट्याने वाढत असल्याने कोविड रुग्णालये व कोविड केअर सेंटर फुल्ल आहेत. मार्चपासून कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने मिरजेतील रुग्णालयांत कोविडवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. शासकीय कोविड रुग्णालयात तब्बल चारशे रुग्ण उपचार घेत असून, येथे रुग्णालयाबाहेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत रुग्ण ताटकळत असल्याचे चित्र आहे.
चाैकट
उपचाराअभावी मृत्यू
महापालिकेचे कोविड केअर सेंटर भरले असून येथे १३० जण उपचार घेत आहेत. इतर खासगी कोविड केअर सेंटरही सुरू आहेत. मात्र, रुग्ण अत्यवस्थ झाल्यास कोठेही व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचे जीव धोक्यात आहेत.
चाैकट
बेड मिळत नाही
मिरजेत शासकीय रुग्णालयासह खासगी कोविड रुग्णालयात सुमारे ८५० खाटांची व्यवस्था आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड मिळत नाही. कर्नाटकातील रुग्णही मिरजेत येत आहेत.
चाैकट
गरीब रुग्णांचे आर्थिक हाल
कोविड उपचाराचे दर ठरवून दिले असले तरी खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णास किमान एक लाख व व्हेंटिलेटर लागणाऱ्या रुग्णासाठी दोन लाख रुपये आकारणी होत आहे. रुग्णांकडून अनामत घेण्यास निर्बंध असले तरी बेड मिळाल्यास ५० हजार ते १ लाख रुपये अगोदर जमा करावे लागत आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार झालेल्या रुग्णांना केवळ २० हजारापर्यंत सवलत मिळत आहे. यामुळे गरीब रुग्णांचे आर्थिक हाल सुरू आहेत.