लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयासमोर पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातून वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यासाठी पारेख हाॅस्पिटलसमोरील गल्लीत पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे.
याबाबत साखळकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, मंगलधाम संकुलात महापालिकेने नव्यानेच आपत्ती व्यवस्थापन, घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू आदी विभाग सुरू केले आहेत. या कार्यालयात मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. या संकुलाच्या समोरच पारेख हाॅस्पिटल आहे. तिथेही रुग्ण व नातेवाइकांची दिवसभर गर्दी असते. या परिसरात नागरिकांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीसह पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. त्यातून वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.
हाॅस्पिटललगतच महापालिकेच्या मालकीचा रस्ता आहे. हा रस्त्यावर वाहतूक नाही. त्यामुळे दुचाकी वाहनांचे पार्किंग या रस्तावजा गल्लीत होऊ शकते. हा रस्ता पुढे शहा हाॅस्पिटलसमोर निघतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांचा बाहेर पडता येऊ शकते. आयुक्तांनी यात वैयक्तिक लक्ष घालून पार्किंगची समस्या सोडवावी, अशी मागणीही साखळकर यांनी केली आहे.