लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आणि मुलांच्या शिक्षणातही अडथळा अद्यापही कायम आहे. यावर ऑनलाइनचा पर्याय निघाला असला, तरी त्यामुळे मुलांचा मोबाइलमधील गुरफटणे वाढले असून, त्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण तासभर आणि मुलांच्या हातात मोबाइल दिवसभर अशी अवस्था झाल्याने, लहान मुलांना चश्मा लागण्याचेही प्रमाण वाढले आहे.
पाच ते सहा इंच स्क्रीन असलेल्या मोबाइलवर मुलांचे शिक्षण सुरू असल्याने डोळ्यावर ताण येत आहे. केवळ ऑनलाइन तास नव्हे, तर त्यानंतरही येणारा गृहपाठ, परीक्षा यासह इतरही शालेय उपक्रम मोबाइलवरच करावे लागत असल्याने, दिवसातील बहुतांश वेळ मुलांचा मोबाइलवरच जात आहे. यामुळे लहान स्क्रीन बघण्याची लागलेली सवय घातक ठरत आहे.
चौकट
लहान मुलांना हे धोके
* बहुतांश वेळ मोबाइलच्या संपर्कात राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी झाल्याने डोळे कोरडे पडणे, डोळे निस्तेज होणे.
* लहान स्क्रीनवर ताण देऊन मजकूर वाचल्याने अथवा बघितल्याने डोळे लाल होतात.
* मुलांचा उत्साह, वर्तणुकीवरही याचा परिणाम होत असतो.
* मोबाइल आणि त्यानंतर राहिलेला वेळ टीव्ही बघण्यात जात असल्याने, मुलांमध्ये डोळ्यांच्याच सर्वाधिक तक्रारी जाणवत आहेत.
चौकट
लहान मुलांमध्येही डोकेदुखीचा त्रास
१) लहान मुलांच्या सततच्या मोबाइल वापरामुळे लहान मुलांमध्ये डोकेदुखीचा त्रास होत आहे.
२) पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष दिल्यास ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
३) मोबाइलऐवजी लॅपटॉपवर अभ्यासाची सोय करून दिल्यास आणखी त्रास कमी होणार आहे.
चौकट
पालकांचीही चिंता वाढतेय
कोट
गेल्या वर्षीपासून मुले घरी आहेत, पण त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हीच अपेक्षा आहे. मात्र, यामुळे मुलांच्या प्रकृतीच्या इतर कुठल्या तक्रारी नसल्या, तरी डोळ्यांना त्रास होत असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे नियमित शाळा सुरू व्हायला हव्यात.
कविता माने
कोट
अजूनही काेरोनाचा संसर्ग कायम असल्याने मुलांना शाळेत पाठविण्यास अडचणी वाटत आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना त्रासही होत आहे, त्यामुळे लवकरच शाळा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुलांचा मोबाइलचा वापर कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करत असतो.
दिलीप कोथळे
कोट
मुलांच्या डोळ्याची काळजी घ्या
लहान मुलांना एकदा डोळ्यांच्या समस्या सुरू झाल्या, तर त्यातून त्यांना त्रास जाणवत राहतो. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणात थोडा ब्रेक घ्यावा. डोळ्यांना ताण येईल, असे मोबाइलवरील वाचन अथवा लेखन मुलांना देऊ नये, याऐवजी लॅपटॉपचा वापर करावा. डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा.
डॉ.सतीश देसाई, नेत्रविभागप्रमुख, शासकीय रुग्णालय