इस्लामपूर : शहरातील पेठ रस्त्यावरील गॅस वेल्डिंग दुकानचालकाने कामाची मजुरी मागितल्याचा राग आल्याने चौघांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, काठी आणि पत्रा कापण्याच्या कात्रीने हल्ला चढवत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी कापूसखेड येथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने दोघांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
विनोद विलास धुमाळे (वय २६) आणि विक्रम विलास धुमाळे (२९, दोघे रा. कापूसखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या खुनी हल्ल्यातील इतर दोन अनोळखी फरार झाले आहेत. याबाबत जखमी अंकुश शेखर गवळी (२९) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अंकुश गवळी यांचा गॅस वेल्डिंगचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी विनोद आणि विक्रम हे दोघे वायसर वेल्डिंग करण्यासाठी आले होते. हे काम झाल्यानंतर गवळी यांनी ६० रुपये कामाची मजुरी मागितली. त्यावर दोघांनी तुला इस्लामपुरात धंदा करायचा आहे का? आमच्याकडून पैसे घेतोस, अशी दमदाटी करीत निघून गेले. त्यानंतर चारच्या सुमारास चारचाकी वाहनातून (एमएच ०६- एच-८४२०) चौघेजण आले. या सर्वांनी अंकुश गवळी यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. त्यावेळी हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. घाटगे अधिक तपास करीत आहेत.
फोटो - ११०१२०२१-आयएसएलएम- क्राईम न्यूज (दोन सिंगल फोटो)
विनोद धुमाळे व विक्रम धुमाळे